– महाराष्ट्रात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर तसेच नागपूर येथे झालेल्या मेळाव्यांमध्ये राज्यातील तरुणांना केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप
मुंबई :- केंद्र सरकारचे विविध विभाग तसेच संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 70 हजाराहून अधिक नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला पंतप्रधानांनी संबोधित देखील केले. रोजगार मेळाव्यांच्या आयोजनाची ही सातवी फेरी आहे.
देशभरात 44 ठिकाणी आज अशाच प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून तेथे उपस्थित केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जात आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे तसेच नागपूर या शहरांमध्ये हे मेळावे आयोजित करण्यात आले.
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या सभागृहात आज झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबीन इराणी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात 25 तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली तर विभाग प्रमुखांच्या हस्ते 74 तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. 267 उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नियुक्तीपत्रे पाठवण्यात आली. मुंबईतल्या सीमा शुल्क विभाग, सीजीएसटी विभाग, केंद्रीय जल आयोग, ईपीएफओ, नौदल, भारतीय टपाल विभाग, बँक ऑफ इंडिया तसेच भारतीय अन्न महामंडळ यांमध्ये देशभरातील विविध राज्यांतून निवडण्यात आलेल्या 342 उमेदवारांना सामावून घेण्यात आले. यावेळी नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला जनतेचा प्रधान सेवक असे संबोधत देशसेवेचे कार्य करत तुम्हाला देखील देशसेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे असे केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. 140 कोटी लोकसंख्येच्या या देशात नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळणे हा तुम्ही तुमचा सन्मान समजला पाहिजे असे त्यांनी नवनियुक्त तरुणांना सांगितले. तुम्हां सर्वांना मिळालेली ही संधी केवळ गणवेषापुरती मर्यादित नसून व्यक्तिगत तसेच सामुहिक आकांक्षांचा आविष्कार करणारी ही एक सेवा आहे असे त्या म्हणाल्या. आज तुमच्यापैकी प्रत्येकजण हा संविधानाला जबाबदार असलेला प्रतिनिधी आहे आणि तुम्ही लोकशाही आणि प्रशासन यांच्याप्रती सामान्य लोकांचा आशावाद जिवंत ठेवावा ही अतिरिक्त जबाबदारी घटनेने आज तुमच्यावर टाकली आहे असे यावेळी नियुक्तीपत्रे मिळालेल्या तरुणांना उद्देशून त्या म्हणाल्या. सीमा शुल्क विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त प्रमोदकुमार अग्रवाल आणि प्रधान आयुक्त सुनील जैन यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
मुंबईमध्ये, मुंबई शेअर बाजार येथे आयोजित करण्यात आलेल्या आणखी एका रोजगार मेळाव्यामध्ये केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की आता देशात पारदर्शकतेला आणि उत्तम प्रशासनाला महत्त्व देणारे सरकार आहे, अशा वेळी सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुणांना देश उभारणीची मोठी संधी मिळालेली आहे. आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून टपाल विभागात 68 हजारांहून अधिक तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी प्रधान मुख्य आयकर आयुक्त गीता रविचंद्रन यांनी देखील उपस्थित उमेदवारांना संबोधित केले. आगामी 25 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत निर्माणाचे स्वप्न साकार करण्यात या सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे त्या म्हणाल्या.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय विकास प्रबोधिनी अर्थात यशदा येथे आज पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एकंदर 198 जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. हे उमेदवार केंद्रीय सीमाशुल्क, वस्तू आणि सेवा कर, सीमा रस्ते, हिंदुस्तान पेट्रोलियम, रेल्वे, बँका, टपाल, संरक्षण मंत्रालय, इत्यादी विविध विभागांमध्ये रुजू होणार आहेत. भारताच्या सर्वंकष विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन काम करण्याचे आवाहन यावेळी डॉ. भारती पवार यानी उपस्थित तरुणांना केले. जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक वातावरणात मिळालेल्या या सरकारी नोकरीचा उपयोग केवळ स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी न करता आपले गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि अखेरीस देशासाठी कसा करता येईल यादृष्टीने विचार करून कर्तव्य बजावण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित तरुणांना केले. नोकरी करताना देखील शिकण्याची जिद्द कायम ठेवून आणि आपल्यातील संशोधनाची वृत्ती जागरूक ठेवून बदलत्या भारताच्या विकास प्रक्रियेत आपले मोलाचे योगदान देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
नागपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तरुणांना नियुक्तीपत्रे वितरीत केली. याप्रसंगी उपस्थित उमेदवारांना संबोधित करताना ते म्हणाले की युवकांनी शासकीय सेवा बजावताना पारदर्शकता, संवेदनशीलता, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, कालबद्ध निर्णय प्रक्रिया या गोष्टी लक्षात ठेवाव्या. नागपूर येथील धरमपेठच्या वनामती सभागृहात झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. केंद्र सरकारमध्ये लालफितीच्या जाळ्यात अडकलेल्या पदभरती प्रक्रियेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विभागांनी मुक्त करून प्रलंबित भर्तीचे काम युद्ध स्तरावर पूर्ण करण्याचे ठरवले आहे, असे गडकरींनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजी नगर येथील आयसीएआय भवन येथे आयोजित रोजगार मेळाव्यात केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते 25 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. एकूण 125 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. आयकर विभागाच्या नाशिक विभागाचे मुख्य आयुक्त राहुल करणा यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.