– पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत दारव्हा येथे कौतुक सोहळा
– आयएएस, आयपीस अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार
यवतमाळ :- ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय सेवेत यावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या तिन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उद्या शनिवार, दि. ६ जुलै रोजी दारव्हा येथे आयोजित करण्यात आला आहे.
दारव्हा येथील शिवलॉन मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कौतुक सोहळ्यात २५६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड हे उपस्थित राहणार आहेत. हे आयएएस, आयपीएस अधिकारी स्पर्धा परीक्षार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील १ हजार २३४ विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा दिली. यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उद्या शिष्यवृत्ती, प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग अमरावती येथील विदर्भ आयएएस अकॅडमी येथे ८ जुलैपासून सुरू होणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास १० महिने कालावधीच्या या स्पर्धा परीक्षा शिकवणीसाठी अमरावती येथे निवास, भोजन व अन्य खर्च भागविण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्यातर्फे प्रतिमाह पाच हजार रुपयांची ‘मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती’ दिली जात आहे. पात्र विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षार्थिंनी शनिवारी आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.