Ø प्रधानमंत्री साधणार लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद
Ø देशभरातील 1 लाख लाभार्थ्यांना सवलतीचे होणार कर्ज वाटप
नागपूर :- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अधिपत्याखाली तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत विदर्भातील नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दीक्षाभूमी येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात 13 मार्च 2024 रोजी कर्ज वाटप व अन्य लाभ वितरीत करण्यात येणार आहेत. निवडक लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवादही साधणार आहेत.
राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ (एनबीसीएफडीसी), राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एनएसएफडीसी) आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळाद्वारे (एनएसकेएफडीसी) देशातील सर्व राज्यांच्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग व सफाई कर्मचाऱ्यांकरिता 1 लाख लाभार्थ्यांना सवलतीचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. तसेच SU-RAJ या राष्ट्रीय पोर्टलचे अनावरण करण्यात येणार आहे. सीव्हर आणि सेफ्टीक टँक कामगारांसाठी आयुष्मान हेल्थ कार्डचे वाटप व पीपीई साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
राज्यातील 33 जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून दीक्षाभूमी येथे आयोजित कार्यक्रमात नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 2004 तर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील 158 लाभार्थी यासाठी पात्र ठरले आहेत. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यान लाभार्थ्यांना सवलतीचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. तसेच सीव्हर आणि सेफ्टीक टँक कामगारांसाठी आयुष्मान हेल्थ कार्डचे वाटप व पीपीई साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता प्रधानमंत्री देशातील 1 लाख लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवादही साधणार आहेत. देशातील सर्व राज्यांच्या 447 जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना सवलतीचे कर्ज वाटप व लाभ वितरण होणार आहे.
राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे पार पडणार आहे.