नागपूर :- शासनाचे समानतेचे धोरण असले तरी महाराष्ट्र शासनाचे मात्र पीएचडी विद्यार्थ्यांच्या फेलोशिप बाबत भेदभाव पूर्ण धोरण असल्याचा आरोप बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी करून महाज्योती व सारथी च्या धरतीवर बार्टीने सर्व पात्र संशोधकांना विनाविलंब फेलोशिप द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात 2022 मध्ये पात्र ठरलेल्या महाजोतीच्या (ओबीसी) 1126 व सारथिच्या (मराठा-कुणबी) 851 पात्र संशोधकांना सरसकट फेलोशिप दिली आहे. परंतु अनुसूचित जातीतील 761 पात्र संशोधकांना 19 महिने लोटूनही बार्टीने फेलोशिप दिलेली नाही. उलट यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन त्यातील फक्त 200 विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार असल्याचे सांगितले. या परीक्षेवरच संशोधकांचा आक्षेप आहे.
बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती नागपूर विभाग व बुद्धिस्ट स्टुडन्ट असोसिएशन ने मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री एकनाथजी शिंदे, राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे संचालक सुनील वारे, उच्च शिक्षण संचालक तसेच अनेक मंत्री व आमदारांना निवेदने दिलेली आहेत.
निवेदनावर संशोधक विद्यार्थी उत्तम शेवडे, लालदेव नंदेश्वर, महानाग रत्न, संदीप शंभरकर, नितीन जगताप, नितीन गायकवाड, ममता सुखदेवे, योगिता पाटील आदींनी सह्या केलेल्या आहेत.