– दिव्यांगांसाठी केंद्रावर आवश्यक सुविधा
यवतमाळ :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत दिव्यांग बांधवांना मतदान करतांना अडचणी येऊ नये यासाठी मतदान केंद्रावर विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात येत आहे. प्रत्येक दिव्यांग बांधव, दिव्यांग मतदारांनी येत्या दि.26 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केले आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांची टक्केवारी वाढण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्राच्याठिकाणी रांगेत प्रतिक्षेत रहावे लागणार नाही तर त्यांना तातडीने मतदान कक्षात मतदानासाठी पाठविण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर कायमस्वरुपी किंवा संपुर्ण सुविधा, अंध प्रकारातील मतदारांकरिता ब्रेल लिपीतील मतदार स्लिप डमी मतदान पत्र (बॅलेट पेपर), अल्पदृष्टी दिव्यांग व्यक्तींकरिता मैग्नीफाइंग ग्लास, मैग्नीफाड्रग शिट इत्यादी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अंध मतदारांना मतदान अधिकाऱ्याच्या परवानगीने मतदानासाठी सहकाऱ्यास सोबत नेण्याची परवानगी राहणार आहे. मागणीनुसार व्हीलचेअर ची व्यवस्था केली जातील. शासकीय वाहनाने दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सुविधा इत्यादीबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील वणी तालुक्यात १ हजार ७५५, राळेगाव तालुक्यात २ हजार १८९, यवतमाळ तालुक्यात १ हजार ८७६, दिग्रस तालुक्यात २ हजार ७५०, आर्णी तालुक्यात २ हजार ६१३, पुसद तालुक्यात २ हजार ४२८ व उमरखेड तालुक्यात ३ हजार २९ ईतकी तालुकानिकाय दिव्यांग मतदारांची संख्या आहे. जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांना मतदान सुलभ करण्याच्या अनुषंगांने उपरोक्त सोयी सुविधांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, तसेच गुगल प्ले स्टोअर मधून ‘सक्षम’ अॅप डाऊनलोड करुन मतदानाच्या ठिकाणी आवश्यक असलेली आपली सुविधा मागणी नोंदवावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी कळविले आहे.