‘ममता’ची ‘दीदी’गिरी

लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना तेथे जसं जंगलराज होतं, तशीच स्थिती गेल्या एक तपापासून बंगाल राज्यात निर्माण झाली आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की, ममता नाव असलेल्या एका महिला मुख्यमंत्र्याच्या कारकीर्दीत हे अत्याचार सर्रास सुरू आहेत आणि त्यांनी पूर्वीच्या लालभाईंनाही मागे टाकलं आहे.‌ त्यामुळे 35 वर्षे डाव्यांच्या आगीत जळणारी बंगाली जनता गेली 13 वर्षे स्वत:ला तृणमूल काँग्रेसच्या फुफाट्यात भाजून घेत आहे. इतका बंगाल ‘बिघडलेला’ आहे.

बांगलादेश सीमेला लागून असलेल्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली गावात जे घडलं ते पाहता कायदा, पोलिस वगैरे काही असतं, यावर बंगालच्या लोकांचा तरी विश्वास बसणार नाही. कारण, हा सारा उधम पंचायत स्तरावरील तृणमूलच्या एका नेत्यानं घडवून आणला आणि ममतानं त्याला मायेनं पाठीशी घातलं. एवढं की, पावणेदोन महिने त्या नेत्याचं अटकेपासून संरक्षण केलं. हायकोर्टानं दणका दिला नसता तर हे ‘ममत्व’ आणखी किती काळ कायम राहिलं असतं, देव जाणे.

जिल्हा परिषद सदस्य शेख शहाजहान असं या कृपापात्राचं नाव आहे. भाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेखची दहशत एवढी आहे की, तृणमूलचे आमदार-खासदार-मंत्री सुद्धा घाबरून, दाती तृण धरून याच्यापुढे हतबल होतात. कारण, जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर याचा पूर्ण पगडा आहे आणि त्या पैशातून त्यानं ममतासह अनेक वरिष्ठ नेत्यांना खिशात ठेवलं आहे. म्हणूनच, ईडीच्या तपास पथकावर हल्ला करवूनही हा भाई तब्बल 55 दिवस मोकाट होता. ममताच्या आशीर्वादानं. 5 जानेवारीच्या हल्ल्याचं प्रकरण देशभर वाजलं, तेव्हा स्थानिकांना हिंमत येऊन शेखच्या एकेका कारवायांना वाचा फुटू लागली. विशेषत: महिलांवर बलात्कार, अपहरण, गायब करणं, जमिनी हडपणं, खंडणी असे अनेक गुन्हे चव्हाट्यावर आले. गेल्या चार वर्षात शेखविरुद्ध 43 तक्रारी झाल्या असल्याचंही उघडकीस आलं. यापैकी एकाही प्रकरणात कारवाई नाही, शेखला अटक नाही की काही नाही. पोलिस हातावर हात देऊन बसलेले. कारण ? भाई तो दीदीका आदमी है। कसं जगावं आम जनतेनं.

बलात्काराच्या अनेक घटनांचा फार बोभाटा झाला तेव्हा स्वत: राज्यपालांनी शेखला पकडण्याचा आदेश दिला. तरी ममताचे पोलिस ढिम्मच. ममताचा पक्ष जनतेला सरळ खोटं सांगत होता की, शेखच्या अटकेला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. ताज्या सुनावणीत स्वत: हायकोर्टानंच हा खोटारडेपणा उघड करताना संताप व्यक्त केला आणि शेखच्या अटकेची परवानगी दिली. यावर तृणमूलची मुजोरी बघा. एक नेता म्हणाला- “शेख फरार आहे.‌ शोधून अटक करायला काही दिवस लागू शकतात.” याचा अर्थ काय ? आम्ही लगेच अटक करणार नाही, असाच ना. फरार कराल तुम्ही, लपवून ठेवाल तुम्ही अन् अटकही टाळणार तुम्हीच.‌ हे लोकशाही राज्य की जंगलराज ? पक्षाची एक महिला प्रवक्ता बलात्काराच्या संदर्भात निर्लज्जपणे असं म्हणाली की, “व्हिडिओ फीत दाखवा, मगच कारवाई करू.” शेवटी देशभरातील दडपणामुळे 55 दिवसानंतर शेखला अटक करावीच लागली. परंतु, एवढा दीर्घ काळ मोकाट राहिलल्या शातीर बदमाशाने आपल्याविरुद्धच्या तक्रारी कमजोर बनविण्याचे प्रयत्न केले असणारच, हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. आता तोंडदेखलेपणा म्हणून दोन पोलिस अधिकाऱ्यांवर ममता सरकारनं कारवाई केली, ही लिपापोतीच.

शेख शहाजहान मूळचा बांगलादेशी आहे. भर बाजारात उभा राहून तो जाहीरपणे सांगत असतो म्हणे- “हां, मैं बांगलादेशी हूं। मुझे हिन्दुस्थानसे कोई लेनादेना नही है।” त्याचे टार्गेट नेहमीच हिंदू समाज, आदिवासी़ स्त्रीपुरुष राहिले आहेत. अशा धर्मांध गुंडाला ममतादीदी राजकीय स्वार्थासाठी पाठीशी घालत आहे. नाव ममता आणि वागण्यात मात्र क्रूरता. अशी कशी ही महिला (की बाईमाणूस ) नेता ? मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकवण्यासाठी अन् पंतप्रधानपदावर कायम डोळा ठेवण्यासाठी ममतादीदी स्वत:चेच “मां, माटी, मानूष” हे ब्रीदवाक्य विसरली. सत्ताने उसे अमानूष बनाके छोडा है…

– विनोद देशमुख

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घोगली मध्ये महीलादिन उत्साहात साजरा

Fri Mar 15 , 2024
महादुला :- महीलादिवसाचे औचित्य साधुन आज भारतातील थोर महीला प्रथमशिक्षिका, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी अहिल्याबाई होळकर, यांघ्याफोटोचे पुजाअर्चना करूनकार्यक्रम सुरळीत सुरू झाला। कार्यक्रम च्या अध्यक्ष म्हणून ज्योती बावनकुळे होत्या परंतू काही अपरिहार्य पणे त्या अनुपस्थित होत्या, त्याचे जागी माजी जिप सदस्या दर्शना रंगारी,यांनी अध्यक्षस्थानी होत्या, प्रमुख अतिथी डाँ, शरयु तायवाडे, कला वाणीज्य, सायन्स काँलेज च्या प्रिन्सिपल,नलीनी धुलस माजी नगरसेविका यांच4 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com