– राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले विद्यार्थांना मार्गदर्शन
नागपूर :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरामध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम दि ४ डिसेंबर रोजी राबविण्यात आली. या अनुषंगाने पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये कुपोषण व रक्तक्षय होऊ नये याकरिता जंतनाशकाची गोळी मनपाच्या सर्व शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रांवर गोळी देण्यात आली. मनपाच्या वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी विध्यार्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. स्वस्थ शरीर असेल तर मन देखील स्वस्थ राहील आणि यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षणावर नीट लक्ष देऊ शकाल म्हणून जंतनाशक गोळी घेण्याचे आवाहन त्यांनी सर्व मुला-मुलींना यावेळी केले. आरोग्य विभागातर्फे 3,90,602 विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
यावेळी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा देवस्थळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विभूती पाणबुडे, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना महाजन, सहायक शिक्षिका छाया कोरासे, पी. एच. एन अर्चना खाडे, पी. एच.एन प्रफुल किन्हीकर यांच्यासह इतर प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम ४ डिसेंबर २०२४ (१० डिसेंबर २०२४ -मॉप अप दिन) ला राबविण्यात आली. जंताच्या संसर्गामुळे बालकांमध्ये तसेच पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये कुपोषण व रक्तक्षय होतो. तसेच थकवा जाणवतो आणि शारिरीक व मानसिक वाढ पूर्ण होत नसल्याने जंताच्या आजाराचा सामना करावा लागतो. राज्यात जवळपास २८ टक्के बालकांमध्ये जंतदोष आढळून येतो. तो कमी करण्यासाठी ‘अल्बेंडॅझोल’ गोळी सर्व बालकांनी घ्यावी असे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी यावेळी म्हटले.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी देखील मुलांना आरोग्य विषयक बाबी सांगितल्या. हात स्वच्छ कसे धुवावे याचे कृतीतून मार्गदर्शन केले. जंतनाशक गोळी कशी दिली जाईल, कोणत्या वयोगटातील मुलांना दिली जाईल, त्याचे फायदे काय आहेत याविषयी संपूर्ण माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जंतनाशक मोहिमेंतर्गत शहर व ग्रामीण भागामधील १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलामुलींना जंतनाशकाची गोळी देण्यात आली. ४ डिसेंबर रोजी प्रत्येक शासकीय व खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी खाऊ घातली गेली. याशिवाय, मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रांवरही या गोळ्या उपलब्ध होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका अर्चना बेलेकर तर प्रास्तविक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.