टास्क फोर्सची बैठक : १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान जंतनाशक मोहिम
नागपूर :- बालकांमध्ये आढणाऱ्या कृमीदोषाचे गांभीर्य लक्षात घेता तो समूळ नष्ट करण्याच्या उद्दिष्टाने नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडी, शाळा आणि कनिष्ट महाविद्यालयात जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार आहे. मातीच्या संपर्कात आल्यामुळे अस्वच्छ हाताच्या माध्यमातून मुलांच्या पोटात जंत जाण्याची शक्यता लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे १० ते १७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान शहरात जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा, महाविद्यालमध्ये तसेच घरोघरी आशा सेविकांच्या माध्यमातून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. ३०) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात टास्क फोर्सच्या बैठकीत मोहिमेची रूपरेषा ठरवून सविस्तर माहिती देण्यात आली.
बैठकीला मनपाचे अतिरीक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, माता बाल संगोपन प्रजनन अधिकारी डॉ. सुनिता लाड, डब्लूएचओ चे सव्हेर्लन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळे, डॉ. बकुळ पांडे, डॉ. मेघा जैतवार, डॉ. प्रिती झरारिया, डॉ. विजय तिवारी, डॉ. शितल वांदिले, डॉ. वसुंधरा भोयर, डॉ. दीपंकर भिवगडे, पब्लिक हेल्थ मॅनेजर डॉ. वैभवी गभणे, डॉ. कुंभारे, डॉ. वाघे, आरोग्य व एनयुएचएम समन्वयक दिपाली नागरे उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधिकाऱयांनी राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेअंतर्गंत १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान १ ते १९ वयोगटातील लाभार्थ्यांना १० ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळीचे वाटप शाळेत करण्यात येणार आहे. यादिवशी गोळ्या घेण्यापासून वंचित राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांना १७ ऑक्टोबरला गोळ्या दिल्या जातील, अशा सूचना यावेळी उपस्थित झोनल अधिकाऱ्यांना दिल्या. मोहिमेअंतर्गंत शहरातील महानगरपालिकेअंतर्गत येणाऱया सर्व शासकीय, खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत जंतनाशक गोळी वाटप करण्यात येणार आहे. याबाबत शाळा स्तरावर पत्राद्वारे माहिती देऊन शाळांना शालेय स्तरावर एका शिक्षकाची या कामासाठी नेमणूक करून विद्यार्थी संख्या आणि गोळी सेवन करणाऱया लाभार्थ्यांबाबत सविस्तर अहवाल मागविण्याच्या सूचना करण्यात आल्या. शाळाबाह्य मुलांना आशा वर्कर्स व शिक्षक शाळेत व घरोघरी जाऊन जंतनाशक गोळी देणार आहेत. यात १ ते ६ वर्ष वयोगटातील शाळेत न जाणारी मुले, ६ ते १० वर्ष वयोगटातील शाळेत जाणारी व शाळेत न जाणारी मुले तसेच १० ते १९ वर्ष वयोगटातील शाळेत/महाविद्यालयात जाणारी व शाळेत/महाविद्यालयात न जाणाऱ्या मुलांचा समावेश आहे.
शिक्षक-पालक संघाची बैठक बोलवा : राम जोशी
बैठकीत मनपाचे अतिरीक्त आयुक्त राम जोशी यांनी जंतनाशक गोळी वाटप कार्यक्रमासंदर्भात पालकांना माहिती देण्यासाठी शाळास्तरावर पालक शिक्षक संघाची बैठक आयोजिक करण्याबाबत सूचना केल्या. तसेच महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे नवरात्रीनिमीत्त सुरु असलेल्या मोफत आरोग्य शिबीरात लाभार्थी संख्या वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. मनपाच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्य़ांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी होऊन, प्रत्येकी एक टीबी रुग्ण दत्तक घ्यावा, असे आवाहन राम जोशी यांनी यावेळी केले.
काय करावे आणि काय करु नये?
Ø औषधाची गोळी घशात अडकू नये यासाठी बालकाला नेहमी गोळी चावून खाण्यास सांगावे.
Ø १ ते २ वर्षे मधील बालकांना गोळीची पावडर करून द्यावी.
Ø आजारी बालकाला कधीही ही गोळी देऊ नये.
Ø ही गोळी चावल्याशिवाय गिळण्याची सूचना बालकाला देऊ नये.
Ø दुष्परिणाम उद्भवल्यास बालकाला उघड्या परंतू छप्पर असलेल्या जागी नेऊन झोपवावे.
Ø विश्रांती घेण्यास सांगावे.
Ø त्याला पिण्याचे स्वच्छ पाणी द्यावे.
Ø लक्षणे गंभीर असून ती कायम राहिल्यास नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
जंतसंसर्ग थांबविण्यासाठी काय करावे?
Ø जंतसंसर्ग थांबविण्यासाठी विशेषत: जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यावर हात स्वच्छ धुवावेत.
Ø पायात चपला, बूट घालावे.
Ø निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे.
Ø व्यवस्थित शिजविलेले अन्न खावे.
Ø निर्जंतुक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुवावीत.
Ø नखे नियमित कापावीत व स्वच्छ ठेवावीत.
Ø जंतसंसर्ग होऊ नये यासाठी अल्बेंडेझॉल ही जंतनाशक गोळी १ ते २ वर्ष वयोगटातील बालकांना अर्धी अर्थात २०० मि.ग्रॅ. द्यावी तर २ ते १९ वर्ष वयोगटातील मुलांना पूर्ण अर्थात ४०० मि.ग्रॅ. द्यावी.