– अंदामान एक्सप्रेसमधील घटना
नागपूर :-दारूची तस्करी करताना एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. विद्या जाट (40), रा. जबलपूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून 60 हजार रुपये किंमतीच्या 50 विदेशी दारूच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या. ही कारवाई अंदमान एक्सप्रेसमध्ये करण्यात आली.
आरपीएफची गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, गाडी क्रमांक 16032 अंदमान एक्सप्रेस मधून दारूची तस्करी सुरू आहे. या माहितीच्या आधारावरून नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर अंदमान एक्सप्रेस येताच पोलिसांनी गाडीचा ताबा घेतला. सर्व डब्यांची झडती घेणे सुरू केले. दरम्यान एस-5 कोचमध्ये एका महिलेची संशयास्पद हालचाल आढळून आली.
तिच्याकडे 5 वजनी बॅग होत्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सर्वच बॅगमध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला. गाडीवरून उतरवून तिला आरपीएफ ठाण्यात आणले. बॅगची तपासणी केली असता 50 विदेशी दारूच्या बॉटल्स आढळून आल्या. त्याची किंमत 60 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाई करून महिलेला पुढील चौकशी करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात दिले. महिलेवर महाराष्ट्र दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरीक्षक नवीन कुमार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक आर.के. भारती, मुकेश राठोड, अजय सिंग, जसबीर सिंग, भूपेंद्र बाथरी, कपिल झरवडे, अश्विन पवार आदींनी केली.