देवग्राम खऱ्या अर्थाने ‘देवग्राम’ बनेल – डॉ. संजय दुधे

– देवग्राम येथे अंत्योदय फॅशन डिझाईनिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन 

नागपूर :-फॅशन डिझाइनिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून उद्योग निर्मितीतून देवग्रामला खऱ्या अर्थाने ‘देवग्राम’ बनवू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव वर्षाच्या निमित्ताने राबविल्या जात असलेल्या ‘रिच टू अनरीच्ड’ उपक्रम अंतर्गत समता फाउंडेशन व अंत्योदय मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने नरखेड तालुक्यातील देवग्राम येथील जीवन विकास महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करताना डॉ. दुधे मार्गदर्शन करीत होते.

जीवन विकास महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंत्योदय मिशन देवग्रामचे अध्यक्ष डॉ. भास्कर विघे, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ शिक्षण मंचचे महामंत्री डॉ. सतिश चाफले, निकिता फार्माचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवलीन खुराणा, निकिता फार्माच्या संचालक इंद्रजितकौर खुराणा, झिम लॅबोरेटरी कळमेश्वरचे सीएफओ श्याम पात्रो, झिम लॅबोरेटरीचे मोहन सौदागरे, प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्षात समाजातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा म्हणून ग्राम चलो अभियान (‘रिच टू अनरीच्ड’) राबवित असल्याचे सांगत प्र-कुलगुरु डॉ. दुधे हे राष्ट्रसंतांच्या विचाराप्रमाणे गाव समृद्ध तर देश समृद्ध व्हावा असे म्हणाले. समाजाच्या विकासासाठी काही लोक धडपडत असतात. स्वतःसह दुसऱ्याच्या देखील झालेला विकास हा शास्वत असतो. येणाऱ्या काळात चांगल्या आरोग्यासाठी शहरातून गावाकडे यावे लागणार आहे. कोरोना संकट काळात कृषी व फार्मा उद्योग क्षेत्राने देशाला तारले असल्याचे डॉ. दुधे यांनी सांगितले. जगात कुटुंब संस्कृती जीवनमूल्य नसल्याने लोप पावत आहे. नीतीमत्तेशिवाय कोणत्याही देशाची संस्कृती टिकू शकत नाही. त्यामुळे जगाने देखील आता ‘वसुदैव कुटुंबकम’ ही भूमिका स्वीकारली असल्याचे ते म्हणाले. उत्साह, हिम्मत, विश्वास, आशा असेल तर जीवनात समृद्धी येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वप्ने पाहत ते जीवनात प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. दुधे केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना शिक्षण मंचचे महामंत्री डॉ. सतिश चाफले यांनी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम समता फाउंडेशन व अंत्योदय मिशन करीत असल्याचे सांगितले. विद्यापीठाकडून राबविले जात असलेले ग्राम चलो अभियान गावांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले. निकिता फार्माचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवलीन खुराणा यांनी मनोगत व्यक्त करताना समता फाउंडेशनने आतापर्यंत ६ लाख नागरिकांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केली असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील मुले-मुली पुढे यावेत, जगात नाव मोठे करावे, असे ते म्हणाले. यावेळी झिम लॅबोरेटरीचे श्याम पात्रो व मोहन सौदागरे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात अंत्योदय मिशन संस्थेच्या वतीने प्र- कुलगुरु डॉ. संजय दुधे यांना अंत्योदय सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सन्मानपत्राचे वाचन उपप्राचार्य डॉ. राजू श्रीरामे यांनी केले. अध्यक्षीय भाषण करताना अंत्योदय मिशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर विघे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा गांधी यांच्या ग्राम विकासाबाबत असलेल्या संकल्पनांची माहिती दिली. गांधी यांनी चरख्यातून स्वावलंबनाची सुरुवात केली. छोट्या व्यवसायातून देशाच्या प्रगतीचा मार्ग आहे. विद्यापीठ गितात देखील ‘उद्योगी तरूण वीरशिलवान दिसू दे’ असा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे यांनी केले. संचालन डॉ. मंगेश आचार्य यांनी केले तर आभार प्रा. नागेश ढोबळे यांनी मानले.

आयुष्यमान भारत कार्ड व नेत्र तपासणी

शिलाई मशिनने सुसज्ज अशी फॅशन डिझायनिंग लॅबचे उद्घाटन करण्यात आले‌. समता फाउंडेशनच्या मास्टर ट्रेनर स्मिता कांबळे यांच्या नेतृत्वात देवग्राम येथील जीवन विकास महाविद्यालयात आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयुष्यमान कार्ड शिबीर आदित्य उखळकर, नेत्र तपासणी शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. तृप्ती सुटे, तंत्रज्ञ नवोशिया अशरफी यांनी नेत्र तपासणी केली‌. यावेळी समता फाउंडेशनच्या सदस्य व महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रातुम नागपूर विद्यापीठ ते झिरो माईल मार्ग 'स्‍व. दत्ताजी डिडोळकर मार्ग' नावाने ओळखला जाणार - ना. नितीन गडकरी

Sat Oct 14 , 2023
– भूयारी मार्गाला देखील दत्ताजींचे नाव : २०० कोटींच्या नवीन प्रकल्पांची घोषणा नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ते झिरो माईल फ्रीडम पार्क मार्ग ‘स्व. दत्ताजी डिडोळकर मार्ग’ या नावाने ओळखला जाणार आहे. दत्ताजी डिडोळकरांचे कार्य आणि त्यांचे आदर्श हे जनहिताची कामे करण्याची प्रेरणा देत राहिल, अशी भावना व्यक्त करीत स्व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह आयोजन समितीचे अध्यक्ष केंद्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com