– राज्य शासनाला ५० कोटींची मागणी, ५ ते ६ हजार लोकांना रोजगार
मुंबई/नागपूर :-विदर्भातील महत्वाचे व नागपूर येथील उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक जलद गतीने घडवून आणण्यासाठी व येथे पायाभूत सुविधांचे सक्षम जाळे उभे करण्यासाठी राज्य शासनाला ५० कोटीचीं निधीची मागणी आज विधानसभेत राज्याचे माजी ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.
स्वातंत्र्यानंतर उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रातून विदर्भात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. वर्ष १९६१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ( कामठी रोड ) असलेल्या या औद्योगिक क्षेत्राचे उद्घाटन केले.
२२.०९ एकर परिसरात पसरलेल्या उप्पलवाडी औद्योगिक परिसरात १०० युनिट कार्यरत असून, त्यात सुमारे ५ ते ६ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही अनेक कंपन्यांनी विस्तारही केला.
राज्यातील मागासलेल्या भागांसाठी राज्य सरकारने अनेक योजना देऊ केल्या, मात्र आज ६२ वर्षानंतर ही उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्राकडे कोणीच लक्ष देताना दिसत नाही. याठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या पाहायला मिळतात. येथे पायाभूत सुविधांचा अभाव आणि देखभाल ही सर्वात मोठी समस्या असल्याचे डॉ. राऊत म्हणालेत.
येथील उद्योजकां मार्फत सांडपाणी, पाणी, मालमत्ता, आग, लाईट आदींसाठी नियमितपणे कर आणि शुल्क भरण्यात येतो. सर्व कर भरूनही प्रशासनाकडून येथील उद्योजकांना कोणतीही सुविधा मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. स्वच्छता, रस्त्यांची देखभाल या मूलभूत सुविधाही दिल्या जात नाहीत. उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक जलद गतीने घडवून आणण्यासाठी व येथे पायाभूत सुविधांचे सक्षम जाळे उभे करण्यासाठी राज्य शासनाला ५० कोटीचीं निधी उपलब्ध करुन या औद्योगिक क्षेत्राचा पुनर्विकास करण्याची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी केली.
पथ दिवे नसल्याने कामगारांना अंधारात शोधावी लागते वाट
या परिसरातील रोडवर पथदिव्याची सुविधाही नाही. रात्री कामाकरिता येणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना अंधारात यावे लागते. पावसामुळे पाण्याने तुंबलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे अनेक अपघातही झाले आहेत. परिसरात पथदिव्यांची सोय व्हावी, अशी मागणी करित डॉ.राऊत यांनी उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रातील समस्याबाबत राज्यसरकारचे लक्ष वेधले.