देव आनंद यांनी आपल्या करिष्माई व्यक्तित्वाने जनमानसावर अमीट छाप निर्माण केली – राज्यपाल रमेश बैस

– गुणगुणता येणारी गाणीच निर्माण होत नसल्याबद्दल राज्यपालांनी व्यक्त केली खंत

– “देव आनंद जन्मशताब्दी निमित्त त्यांच्यावरील कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई :- प्रसिद्ध अभिनेते देव आनंद भारतीय चित्रपट विश्वातील एक दंतकथा होते. आपल्या करिष्माई व्यक्तित्वाने तसेच अभिनय कौशल्याने त्यांनी जनमानसावर अमीट छाप निर्माण केली. त्यांच्या चित्रपटांना दशके लोटली तरी देखील आजही त्यांच्या चित्रपटांमधील गाणी लोकांच्या जिभेवर आहेत. भारतीय चित्रपटाच्या सुवर्ण युगाचे ते एक निर्माते होते, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

देव आनंद यांच्या १०० व्या जयंती निमित्त त्यांच्यावरील ‘के दिल अभी भरा नहीं’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १७) मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

देव आनंद चित्रपट सृष्टीत आले, त्यावेळी भारतीय सिने सृष्टी एका वेगळ्याच उंचीवर होती. त्याकाळात एकापेक्षा एक अभिनेते व अभिनेत्रीच नव्हते, तर उत्कृष्ट गीतकार व संगीतकार देखील होते, असे सांगून आज देखील गाण्याच्या रिॲलिटी शो मध्ये लहान मुले जुनीच गाणी गातात यातच त्या गाण्यांचे यश आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात गुणगुणता येतील अशी गाणीच निर्माण होत नाहीत असे सांगून, संगीताच्या नावाखाली जे काही निर्माण होत आहे तो केवळ कल्लोळ आहे, अशी खंत राज्यपालांनी व्यक्त केली.

राज्यपाल पदाचा राजशिष्टाचार असल्यामुळे थिएटर मध्ये जाऊन सहज चित्रपट पाहता येत नाही किंवा मुंबईची प्रसिद्ध पाव भाजी खाता येत नाही या बद्दल खंत व्यक्त करुन एकेकाळी आपण मित्रांसह, रांगेत उभे राहून व प्रसंगी ‘ब्लॅक’ मध्ये तिकिटे घेऊन, चित्रपटांचे पहिल्या दिवशी पहिला शो पाहत असू, अशी आठवण बैस यांनी सांगितली.

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बसने लाहोर येथे जाताना त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ‘भारतातून काय आणू’ असे विचारले. त्यावर, भारतातून देव आनंद यांना घेऊन यावे, असे शरीफ यांनी सांगितले, व त्या नुसार वाजपेयी हे देव आनंद यांना घेऊन लाहोर येथे गेले, अशी आठवण राज्यपालांनी यावेळी सांगितली.

देव आनंद यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच केले नाही, तर त्यांनी लोकांचा आत्मविश्वास व आकांक्षा जागवल्या तसेच राष्ट्रीय एकात्मतेला चालना दिली असे राज्यपालांनी सांगितले.

देव आनंद यांच्या वरील या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज व वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

प्रकाशन सोहळ्याला वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री, उपाध्यक्ष अजय रुईया, कझाकस्थानचे मानद वाणिज्यदूत महेंद्र सांघी, कोरस इंडियाचे अध्यक्ष आनंद थिरानी, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, गायक अनुप जलोटा यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनुप जलोटा यांनी देव आनंद यांच्या गाण्याच्या ओळी गायल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु - धनंजय मुंडे

Sat Nov 18 , 2023
– आतापर्यंत 965 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप मुंबई :– प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1 हजार 954 कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी आतापर्यंत 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती आज राज्य मंत्रीमंडळ बैठकीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com