माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष संदेश
घर घर संविधान उपक्रमाचा नागपूर येथे प्रारंभ
विभागातील प्रत्येक जिल्ह्यात घर घर संविधान उपक्रम प्रभावीपणे पोहचविण्याचा निर्धार
नागपूर :- भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला बहाल केलेले बहुमोल स्वातंत्र, समान न्यायाचे तत्व, नागरिक म्हणून दिलेले अधिकार व यासमवेत दिलेली कर्तव्याची जबाबदारी याबाबत समाजातीाल प्रत्येक घटकात जनजागृती होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान आपण अंगिकारुन आज 75 वर्ष झाली असून या औचित्याने शासनाने घर घर संविधान हा घेतलेला उपक्रम तेवढाच महत्वाचा असल्याचे प्रतिपादन आदिवासी व सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी केले. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले.
संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त घर घर संविधान उपक्रमाचा आज नागपूर येथे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उप संचालक विजय वाकुलकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. मंगेश वानखेडे, , सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, दिव्यांग यांचा प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला.
*माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष संदेश*
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचे मोल प्रत्येक गावांमध्ये पोहचविण्यात यशस्वी झालो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापाठोपाठ आपण आणखी एका महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनेचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यास सिध्द झालो आहोत. भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह मुलभूत स्वातंत्र्य बहाल करणारी राज्यघटना आपल्याला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळाली. 26 नोव्हेंबर रोजी ती स्वीकारण्याच्या घटनेला 75 वर्ष होत आहेत. राज्यघटना आपण अंगिकारली आहे, याचाच अर्थ यातील सर्व मूल्य, आपल्या अधिकारासह राष्ट्राप्रती संविधानाने दिलेली कर्तव्याची भावना आपण स्वीकारली आहे. याच बरोबर सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्ष मूल्याचा प्रचार व प्रसार ही सारी जबाबदारी, भावना यात अंतर्भूत आहे. या सर्व भावभावना, शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याचा संविधानातील संकल्प, समता, विवेक ही सारी मूल्य आपण संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये सर्व घटकांपर्यंत अधिकाधिक रुजविण्यासाठी कटिबध्द होऊ या, अशा भावना माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात व्यक्त केल्या.
विभागातील प्रत्येक जिल्ह्यात घर घर संविधान उपक्रम प्रभावीपणे पोहचविण्याचा निर्धार – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी
भारतीय संविधानातील स्वातंत्र्याचे, सामाजिक जबाबदारीचे, कर्तव्य तत्परतेचे, नागरिक म्हणून देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचे मोल विभागातील सर्व जिल्ह्यात पोहचविण्यासाठी आपण विविध उपक्रम हाती घेणार आहोत. यात शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत, ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत व याच बरोबर प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येकापर्यंत भारतीय राज्य घटनेचे मूल्य पोहोचविले जाणार असल्याचे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.