नागपूर :- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे ‘प्रांतीय अधिवेशन २०२४’ नुकतेच पार पडले. या प्रांतीय अधिवेशनात माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रांतीय कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली. यात प्रांतीय अध्यक्षपदी अरविंद देशमुख, सरकार्यवाहपदी आमदार सुधाकर अडबाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सर्वात जास्त शिक्षक सदस्यसंख्या असलेली स्वातंत्र्यपूर्व काळातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ही महाराष्ट्रातील बलाढ्य शिक्षक संघटना आहे. या संघटनेने आजवर अनेक आमदार सभागृहात पाठवून शिक्षकांच्या समस्या सोडविल्या आणि आजही संघाचे आमदार तथा सरकार्यवाह सुधाकर अडबाले हे शिक्षकांच्या समस्या सोडवित आहेत.
वि.मा.शि. संघाचे प्रांतीय अधिवेशन नुकतेच मोठ्या थाटात पार पडले. या अधिवेशनात प्रांतीय कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यात प्रांतीय अध्यक्षपदी अरविंद देशमुख (यवतमाळ), सरकार्यवाहपदी आमदार सुधाकर अडबाले (चंद्रपूर), प्रांतीय उपाध्यक्ष म्हणून रमेश काकडे (नागपूर), जयप्रकाश थोटे (वर्धा), जयकुमार सोनखासकर (अकोला), विजय ठोकळ (अकोला), विभागीय कार्यवाहपदी चंद्रशेखर रहांगडाले (भंडारा), बाळासाहेब गोटे (वाशिम) तर कोषाध्यक्षपदी भूषण तल्हार (नागपूर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, श्रावण बरडे, आमदार सुधाकर अडबाले यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. नवनियुक्त प्रांतीय कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. या प्रांतीय कार्यकारिणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. विजय हेलवटे व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लक्ष्मण धोबे यांनी जबाबदारी पार पाडली.