मुंबई :- कॅम्लिन उद्योग उभा करणारे ज्येष्ठ उद्योजक सुभाष दांडेकर यांच्या निधनाने मराठी उद्योग विश्वाला नावलौकिक मिळवून देणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की, सुभाष दांडेकर यांनी केवळ कॅम्लिन उद्योगाची उभारणी केली नाही, तर हजारो तरुणांच्या हाताला रोजगार देऊन त्यांच्या जीवनात रंग भरले. मूल्यांची जपणूक करण्याला त्यांनी मोठे प्राधान्य दिले. उद्योग वाढविताना, त्यांनी मूल्य आणि माणसे जपली. श्रमाला प्रतिष्ठा मिळायला पाहिजे, यासाठी ते कायम आग्रही राहिले. मराठी माणूस आपल्या कौशल्याने, कष्टाने उद्योग उभा करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी उभे केले. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.