मुंबई :-मोदी सरकारच्या ‘गरीब कल्याण’ कार्यक्रमातून गरीबांचे उंचावलेले जीवनमान, सर्वसमावेशक विकासामुळे जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था याची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसांपर्यंत घरोघरी जाऊन पोहचविली पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. भोपाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १० लाख बूथ वरील कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी उपस्थित होते. पक्षाच्या घर चलो अभियानात आपण स्वतः ५०० घरी जाणार असून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या अभियानासाठी वेळ काढलाच पाहिजे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त आखलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मेरा बूथ सबसे मजबूत‘ या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी १० लाख बूथवरील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत एक इतिहास रचला आहे. मोदी सरकारची ९ वी वर्षपूर्ती जनतेशी संवाद साधण्याची उत्तम संधी असल्याची पक्षाची भूमिका आहे. उत्तरदायित्वाच्या भावनेतून मोदी सरकारने राबविलेल्या लोकोपयोगी योजनांची माहिती जनसंवादाच्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत .
गेल्या ९ वर्षांत मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या विकासकामांमुळे जगभरात देशाची मान उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जगन्मान्य नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जाते. हा संपूर्ण देशाचा सन्मान आहे. मोदी सरकारच्या काळात भारतात लोकशाही केवळ नांदतच नाही तर ती अधिक समृद्ध होत आहे असे प्रशंसा पत्रक अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधून प्रसिद्ध करण्यात आले. परदेशात जाऊन लोकशाहीबाबत मोदी सरकारला नावे ठेवणा-यांना ही चपराक आहे असे फडणवीस म्हणाले.
मोदी सरकारच्या काळात गरीब कल्याण योजनांचे १०० टक्के लाभ गरजूंपर्यंत पोहोचत आहेत. गरीब कल्याणाच्या अनेक योजनांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. पायाभूत सुविधा विकासाचे महत्व जाणून सरकारने अशा योजनांसाठी १० लाख कोटींची भरीव तरतूद केली आहे. मोदी सरकारच्या नियोजनबद्ध विकासकामांमुळे पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल जगातील तिस-या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने होत आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.