37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रीडा ध्वजप्रदान

मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यात 26 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून यावेळीही आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतील. सर्वाधिक पदके जिंकून राज्याला अव्वल स्थान मिळवून देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज व्यक्त केला. राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षणासह सर्वतोपरी मदत करण्यात येत असून यापुढे खेळांडूच्या तयारीसाठी निधीची अडचण भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोवा येथे होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेल्या ९०० खेळाडू व २०० मार्गदर्शक अशा एकूण ११०० सदस्यांच्या महाराष्ट्राच्या पथकाकडे क्रीडाध्वज हस्तांतर करण्याचा सोहळा तसेच शुभेच्छापर निरोप देण्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनचे महासचिव नामदेव शिरगावकर, उपाध्यक्ष प्रदीप गंधे, महाराष्ट्र कबड्डी संघाचे सचिव बाबूराव चांदेरे आदींसह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होत असलेले खेळाडू, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सहभागी सर्वच खेळाडूंकडून महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा आहे. मात्र, अपेक्षांच्या दबावाखाली न येता खेळाडूंनी त्यांचा नैसर्गिक खेळ खेळावा आणि सर्वोत्तम कामगिरी करावी. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेने, राज्य शासन, राज्यातील साडेतेरा कोटी नागरिकांच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मागच्या वेळी, ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ८०० खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे पथक पाठविले होते. त्यावेळी ३९ सुवर्ण, ३८ रौप्य, ८३ कांस्य अशी १४० पदके मिळाली होती. यावेळी आपले पथक मोठे आहे. यावेळी आपली तयारीही चांगली आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वासही आहे. त्यामुळे ३६ व्या क्रीडा स्पर्धेपेक्षा, ३७ वी क्रीडा स्पर्धा आपल्याला अधिक पदके मिळवून देणारी, राज्याच्या गौरवात भर टाकणारी असेल. महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकून, पहिला क्रमांक मिळवलेला असेल. त्यावेळी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वजण पुन्हा एकत्र येऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेले खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून जात आहेत. तिथे राज्याला मान खाली घालावी लागेल, अशी कुठलीही चुकीची गोष्ट तिथे घडणार नाही, याची शपथ, काळजी सर्वांनी घ्यावी. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या खेळातून, खिलाडूपणातून, वागण्यातून, क्रीडा रसिकांची मने जिंकण्याचे काम करावे. राज्यासाठी पदके जिंकणे आणि खिलाडूपणे वागणे, या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत. याची जाणीवही त्यांनी खेळाडूंना करुन दिली.

महाराष्ट्राने सुरुवातीपासून खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. गावागावांत क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी राज्याचं स्वतंत्र क्रीडा धोरण आहे. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात क्रीडा संकूल असले पाहिजे. खेळाडूंना सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय, निमशासकीय, महामंडळांच्या सेवेत, खासगी कंपन्यांमध्येही नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, यासाठीही शासनाचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. या प्रयत्नांना यशही मिळत आहे, असेही उपमुख्यंत्री पवार म्हणाले.

आशियाई स्पर्धेत देशाची आणि महाराष्ट्राची उज्ज्वल कामगिरी

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या, 19 व्या आशियाई स्पर्धांमध्ये देशाच्या आणि आपल्या राज्याच्या खेळाडूंची कामगिरी सरस ठरली. आशियाई स्पर्धांमध्ये भारताने, २८ सुवर्ण, ३८ रौप्य, ४१ ब्राँझ, अळी एकूण १०७ पदके जिंकली. यात महाराष्ट्राचे मोलाचे, महत्वाचे योगदान होते. आशियाई स्पर्धेत, भारताने जिंकलेल्या 28 सुवर्णपदकांपैकी 15 सुवर्णपदके महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिंकली आहेत. याशिवाय महाराष्ट्राला 7 रौप्य, 5 कांस्य पदकं मिळाली आहेत. क्रीडा क्षेत्रातला देशाचा आणि राज्याचा हा विजयरथ पुढे नेण्याचे काम यापुढील काळात, राष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना करायचे आहे, याची जाणीव ठेऊन तुम्ही तयारी केली पाहिजे. चांगले खेळले पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

आशियाई पदक विजेत्यांच्या बक्षीसात भरघोस वाढ

राज्य सरकार सातत्याने खेळ आणि खेळाडूंच्या पाठिशी राहिले आहे. चीनमधल्या, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या, राज्याच्या खेळाडूंना १ कोटी रुपयांचे आणि मार्गदर्शकाला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याचा शासन आदेश निर्गमित केला आहे. आशियाई स्पर्धेतल्या रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ७५ लाख रुपये आणि मार्गदर्शकाला ७ लाख ५० हजार रुपये मिळणार आहेत. कांस्यपदक विजेत्या खेळाडूला ५० लाख आणि मार्गदर्शकाला ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना, चांगली तयारी करता यावी म्हणून, प्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्याचा निर्णयही आपण घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या खेळाडूस ७५ लाख, मार्गदर्शकास ७ लाख ५० हजार, रौप्यपदक विजेत्या खेळाडूस ५० लाख, मार्गदर्शकास ५ लाख तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूस २५ लाख, मार्गदर्शकास २ लाख ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात क्रीडा विद्यापीठ सुरु करण्यात आले आहे. पुण्यामध्ये ऑलिम्पिक भवन उभारण्यात येत आहे. अलिकडच्या काळात जलतरण, नेमबाजी सारख्या खेळातंही महाराष्ट्राचे खेळाडू चमकत आहेत. जागतिक पातळीवर भालाफेकीचं सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या पूर्वजांचे संबंधही महाराष्ट्राशी जोडलेले आहेत, ही बाब अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी, इथल्या क्रीडा संस्कृतीची मुळं अधिक घट्ट करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. खेळाडूंना सन्मान आणि खेळांना प्रोत्साहन देण्याच्या कामात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांनी केला सत्कार

Thu Oct 26 , 2023
मुंबई :- बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी बर्लिन येथे झालेल्या ‘स्पेशल ऑलिम्पिक’मध्ये देशासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या महाराष्ट्रातील २० खेळाडू व प्रशिक्षकांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. २५) राजभवन मुंबई येथे सत्कार करण्यात आला. बौद्धिक दिव्यांग मुलामुलींनी ऑलिम्पिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पदक प्राप्त करणे, हा राज्यासाठी तसेच देशासाठी बहुमान आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. पूर्वी ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये भारत पदकतालिकेत खालच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com