– ३०६३ घरी आढळला लारवा : ३०८ जणांना बजावले नोटीस
नागपूर :- नागपूर शहरात डेंग्यूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे कठोर उपाययोजना केली जात आहे. मनपाच्या आरोग्य चमूद्वारे ऑगस्ट महिन्यामध्ये १ लाख २३ हजार ३१४ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यापैकी ३०६३ घरांमध्ये डेंग्यूचा लारवा आढळून आला. मनपाद्वारे या महिन्यात ३०८ जणांना नोटीस बजावली आहे. या महिन्यामध्ये २८४२ डेंग्यू संशयीतांची नोंद झालेली आहे. यापैकी २२४ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले. तर १ जानेवारी २०२३ पासून ३१ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये शहरात ३७१७ डेंग्यू संशयीतांची नोंद असून या कालावधीमध्ये ३३५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे.
डेंग्यूपासून बचाव व्हावा या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. मनपाच्या आशा सेविका तसेच परिचारिका घरोघरी जाउन सर्वेक्षण करीत आहेत. घरामध्ये किंवा परिसरात कुठेही पाणी साचलेले आहे का, असल्यास त्यात औषध फवारणी करून किंवा पाणी जमा असलेली भांडी रिकामी करून डासोत्पत्ती होणारी स्थळे प्रतिबंधित केली जातात. याशिवाय घरात कुणालाही डेंग्यू सदृश्य लक्षणे असल्यास त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करतात.
योग्य वेळी निदान आणि वेळीच उपचार घेतल्यास डेंग्यू लगेच बरा होउ शकतो. त्यामुळे नागरीकांनी डेंग्यू सदृश्य लक्षणे आढल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा. परिसरात किंवा घरी डेंग्यू रुग्ण आढळल्यास स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. कुठेही पाणी जमा राहणार नाही याची काळजी घ्यावी. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा. डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाउन नि:शुल्क वैद्यकीय सल्ला घ्यावा. मनपाची आरोग्य चमू सर्वेक्षणासाठी घरी आल्यास त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
संक्षिप्त आकडेवारी
१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२३
डेंग्यू संशयीत – ३७१७
एकूण पॉझिटिव्ह – ३३५
१ ते ३१ ऑगस्ट २०२३
डेंग्यू संशयीत – २८४२
एकूण पॉझिटिव्ह – २२४
घरांचे सर्वेक्षण – १,२३,३१४
लारवा आढळलेली घरे – ३०६३
नोटीस – ३०८