पावसाळ्यापूर्वी तयारीच्या दृष्टीने प्रत्येक झोनमध्ये वाहन
नागपूर : पावसाळ्यात उद्भवणा-या आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुलभतेच्या दृष्टीने कार्य करण्यासाठी तसेच पावसाळ्यात जमा होणारे पाणी, विहिरींमधील दुषीत पाणी त्याचा उपसा करण्यासाठी मनपाद्वारे विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून या 8 वाहनांचे बुधवारी (ता.२५) मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत परिसरात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी फीत कापून या वाहनांचे लोकार्पण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त महेश धामेचा, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आदी उपस्थित होते.
नागपूर शहरातील नागरिकांना पावसाळ्यात निर्माण होणा-या समस्यांवर तात्काळरित्या दिलासा मिळावा यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुलभतेच्या दृष्टीने त्यांना झोनमधून तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रत्येक झोनमध्ये एक असे पाणी उपसा करणारे वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. या वाहनांमध्ये जनरेटर असल्याने आपात्कालीन स्थितीत काम करताना त्यावरुन विद्युत पुरवठा करता येउ शकेल, येथे सबमर्शिबल पम्पची व्यवस्था असल्याने पाणी उपसा करण्यात सुलभता निर्माण होईल. पावसाळ्यात निर्माण होणा-या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मनपा सर्वेतोपरी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी यावेळी सांगतिले.
प्रारंभी प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी वाहनांची तांत्रिक माहिती दिली. मागील अनेक वर्षांपासून अग्निशमन विभागाद्वारे अश्या वाहनांव्दारे विहिरींचे दुषीत पाणी उपसा करण्याचे कार्य केले जाते. पाणी उपसा करण्यासाठी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात अर्ज असल्याने स्थानिक स्तरावर त्यांना मदत मिळावी या हेतूने ८ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांचा वापर झोनतर्फे आपत्ती व इतर वेळेस पाण्याचा उपसा करण्यासाठी होणार आहे. तसेच प्रकाश व्यवस्था कार्याकरीता सुध्दा याचा उपयोग केला जाईल. पिकअप व्हॅन, 10 के.व्ही.ए. क्षमतेचा जनरेटर, 5 एच.पी. इलेक्ट्रिक सबमर्सीबल पम्प, वाहनांचे फेब्रिकेशन असे प्रती वाहन १३,६६,९८२ रुपये खर्च असून एकूण आठ वाहनांना १,०९,३५,८५९ रुपये एवढा खर्च आलेला आहे, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले.
झोनस्तरावर देण्यात आलेल्या या वाहनांमुळे दुषित पाण्यांचा उपसा आणि आपात्कालीन स्थितीत सहकार्य मिळण्यासाठी लागणारा वेळ कमी होउन नागरिकांना झोनस्तरावर लवकर मदत मिळू शकणार आहे.