नागपूर दि. २७ : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे आणि अन्यबाबींचा नियमित पुरवठा होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य प्रवीण दटके यांनी हाफकीनच्या औषध आणि यंत्रसामग्री पुरवठ्याच्या कार्यप्रणालीमुळे रुग्णालयांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना मंत्री गिरीश महाजन बोलत होते.
मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, हाफकीन संस्थेकडून वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषध, सर्जिकल साहित्य आणि यंत्रसामग्री पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हाफकीनला सुमारे पंधराशे कोटी रुपयांचा निधी दिला मात्र त्यापैकी सुमारे ६५० कोटी रुपयांचा निधी विनावापरामुळे परत येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संस्थांना १० टक्क्यांवरून ३० टक्के खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच हाफकीन महामंडळाच्या खरेदी कक्षाचे सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. औषध खरेदीबाबत नियमावली तयार करण्याची कार्यवाही देखील सुरू असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.
उपसभापतींकडे होणार बैठक
हाफकीन संस्थेच्या कार्यप्रणाली आणि संशोधकांच्या सोयीसुविधांसंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुढच्या महिन्यात बैठक आयोजित करण्यात यावी. अशी सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यानी केली. तत्पूर्वी हापकीन संस्थेची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भातील चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण पोटे पाटील, सतीश चव्हाण, सचिन अहिर आदींनी सहभाग घेऊन उपप्रश्न उपस्थित केले.