मृत्युने मात केली मित्राने हार पत्करली 

मागला जवळपास संपूर्ण आठवडा मी फूड फेस्टिवल निमित्ते दुबईत व्यस्त होतो. 23 फेब्रुवारीला सकाळपासून दुबईत फिरायचे थोडेफार शॉपिंग, मनाशी ठरवून तयार झालो आणि लागोपाठ त्या बातम्या कानावर थडकल्या, आधी मनोहरपंत गेल्याची आणि लागोपाठ दुसरी बातमी, आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मृत्यूची, पंत मुख्यमंत्री असतांना मी त्यांच्या सतत संपर्कात असे, त्यांचा एवढा लाडका कि त्यांनी मुख्यमंत्री असतांना मला ते संगतीने इजिप्त इस्रायल दौऱ्यावर घेऊन गेले होते, अशा अनेक आठवणी आहेत त्यावर पुन्हा कधीतरी. पंतांचे मुख्यमंत्रीपद गेले नंतर ते लगेचच लोकसभेत सभापती झाले आणि त्यांच्याशी संपर्क तुटला. राज्यातला नेता दिल्लीत गेला कि असे हमखास घडते, दिल्लीत गेलेला नेता येथे असलेल्या मित्रांना कार्यकार्त्यांना विसरतो, आपणही स्वतःला कामात जुंपून घेतो म्हणून नेत्यांशी भावनिक गुंतवणूक शक्यतो नसावी, निदान पत्रकारांनी तरी प्रोफेशनल रिलेशन्स ठेवावेत म्हणजे मानसिक त्रास होत नाही. पंत दिल्लीतून परतल्यानंतर कधीतरी शिवाजी पार्कात फिरतांना भेटायचे पण धकाधकीच्या राजकारणाचा मला वाटते त्यांना कंटाळा आलेला असावा, शेवटले काही वर्षे उगाच अपमानित होण्याच्या भानगडीत न पडता ते घरात किंवा व्यवसायात अधिक रमले असावेत, नारायण राणे यांच्या सांगण्यावरून सूचनेवरून 1999 दरम्यान माझा मित्र पत्रकार विजय कुंभार याने पंतांच्या जावयाचे गिरीश व्यास यांचे कुठलेसे प्रकरण बाहेर काढले ज्यात पुढे पंतांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले आणि नारायण राणे यांच्या मनासारखे घडून आले ते मुख्यमंत्री झाले आणि तेथूनच बाळासाहेबांच्या शिवसेनेत व कुटुंबात ह्रासाला नाशाला सुरुवात झाली, उद्धव यांना नाही म्हणायला आता आणखी एक संधी चालून आल्यासरखी दिसते आहे, त्यांची भाजपाशी युती करण्याची धडपड जर यशस्वी ठरली तर उद्धव आणि त्यांच्या शिवसेनेला पुन्हा सुगीचे दिवस येतील असे वाटते…

23 तारखेला अख्खा दिवस अस्वस्थ होतो, प्रिय मित्र राजेंद्र पाटणी यांच्या आठवणीत दुःखी होतो, घरातला माणूस आपल्याला कायमचा सोडून गेला त्या दुख्खात मी होतो. अतिशय सुसंस्कृत निर्व्यसनी सज्जन चारित्र्यसंपन्न मित्र अखेर आम्हाला सोडून गेला, त्याला आणि आम्हा साऱ्यांना त्याच्या या मृत्यूची कल्पना होती तरीही पाटणी यांनी मृत्यूची कधीच भीती बाळगली नाही, इस्पितळात दाखल होऊन कठीण असे उपचार करून घ्यायचे आणि बाहेर पडले कि पुन्हा स्वतःला कामात गुंतवून ठेवायचे, अलिकडल्या दोन वर्षात हे त्यांच्याबाबतीत नित्याचेच झाले होते. आमच्या नरिमन पॉईंट च्या ऑफिस मध्ये ते मी आणि विक्रांत कित्येक तास देहभान विसरून गप्पा मारत असू, बोलतांना कित्येकदा देवेंद्र फडणवीसांचा विषय ते हमखास काढायचे आणि विविध किस्से रंगवीत, फडणवीस कसे ग्रेट, आम्हाला देहभान विसरून सांगायचे. नेमकी ती संधी चालून आली नाही म्हणजे फडणवीसांनी त्यांना मंत्री मंडळात स्थान दिले नाही पण त्यावर कधीही पाटणी यांनी व्यक्तिगत नाराजी व्यक्त केली नाही किंबहुना फडणवीसांच्या सर्वाधिक विश्वासू आणि जवळचा आमदार या प्रतिमेला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. अर्थात पाटणी यांच्या प्रत्येक सुख दुख्खात आणि सार्वजनिक जीवनात फडवीस यांचे मोलाचे योगदान होते ज्याचा उल्लेख पाटणी आमच्याकडे अनेकदा करायचे. एकत्र लंच किंवा किमान कपभर कॉफी, आमचा हा कित्येकदा गप्पांच्या ओघात कार्यक्रम असायचा मग कधीतरी शेजारच्या इमारती मधला आमचा कॉमन मित्र अजय अग्रवाल गप्पांच्या फडात येऊन मिसळायचा. मित्रवर्य देवेंद्र फडणवीस आणि पोटी जन्मलेले कर्तृत्ववान मुलगा आणि मुलगी, पाटणी यांच्या बोलण्यात हे विषय हमखास असायचे. तशी माझी पाटणी यांच्याशी फार जुनी ओळख, दिवंगत मुकेश पटेल यांनी त्यांच्याशी माझी पहिल्यांदा ओळख करून दिली त्यानंतर ती सतत मैत्री सतत वाढत गेली ज्यात आपोआप भावनिकता निर्माण झाली. पाटणी यांना मंत्री म्हणून मला बघायचे होते पण ते स्वप्न शेवटी अधुरे अपुरे राहिले त्याची खंत वाटते. राजेंद्र आमदार म्हणून नेता म्हणून मित्र म्हणून खूपच छान माणूस होता म्हणून हमखास निवडून यायचा. तो नेता असूनही कुटुंबवत्सल होता आणि सामान्य माणसाचा मतदाराचा पैसा लुटणारा लुबाडणारा नव्हता, अगदी गंभीर आजारपणातही मतदारांसाठी झटणारा होता. असे नेते असे आमदार अलीकडे खचित क्वचित बघायला मिळतात म्हणून माझ्यासारख्या चिकित्सक पत्रकाराला देखील असे मनापासून भावतात. मित्रा तुझी आठवण आता आयुष्यभर मनाला हृदयाला कायम अस्वस्थ करून सोडेल….श्रद्धांजली !!

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास वंदे मातरम् व राज्य गीताने सुरुवात

Mon Feb 26 , 2024
मुंबई :- राज्य विधिमंडळाच्या सन २०२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास विधानसभेत ‘वंदे मातरम्‌’ आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह मंत्री आणि विधानसभेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com