मेयोमध्ये जागतिक श्रवण दिन साजरा
नागपूर : मातांना प्रसुतीमध्ये बाळ बहिरे असल्याचे कळते अश्यावेळी योग्य उपचार आवश्यक असतात. त्यामुळे त्यांचे भावी जीवन अधंकारमय होऊ नये. यासाठी बालकांच्या मातांना उपचाराबाबत जागृत करणे आवश्यक आहे. बहिरेपणाबाबत जागरुक राहणे, प्रत्येक नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. याबाबत विस्तृत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.
इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो) येथे आज जागतिक श्रवण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनावणे, अधिक्षक डॉ. लिना धांडे, नाक, कान व घसा विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी, डॉ. इएनटी आसोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नंदू कोळवटकर, विदर्भ अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. समीर ठाकरे, डॉ. मुंदडा, डॉ. आनंद सौदी, डॉ. समीर चौधरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. वेदी यांनी आतापर्यंत 49 कॉकरेल इम्पलांटमेट केले आहे. आज 50 व्या इम्पलांटमेटची कार्यवाही सुरु असून त्यांबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागीतील रूग्णांमध्ये बहिरेपणा असल्यास लवकर लक्षात यावा. त्यांना अगदी कमी पैशात मुलावर लहानपणीच ईलाज करता यावा. यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात यंत्रणा निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. कर्कश आवजापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. याचे परिणाम नंतर दिसून येतात. आरोग्य विभागाच्या या उपक्रमास जिल्हा परिषदेचे नेहमी सहकार्य राहील. समन्वयातून काम केल्यास कोणतेही काम अशक्य नाही, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात डॉ. जीवन वेदी यांनी श्रवण दिनाची माहिती दिली. कानाचा आकार 3 सारखा असल्यामुळेच आज जागतिक श्रवण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेद्वारे भरपूर निधी नाक, कान व घसा विभागाला मिळाल्याबद्दल आभार व्यकत् केले.
जगात 6.3 टक्के व्यक्ती बहिरेपणानेग्रस्त असून दरहजारी 10 मुलांना हा आजार आहे, त्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे डॉ. प्रशांत निखाडे यांनी सांगितले. नंदू काळवटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
जन्मजात बहिरेपण अलेल्या बालकांच्या मातेनी आपले मनोगत व्यक्त करुन शासकीय रुग्णालयामुळेच माझ्या बाळाला बहिरेपणापासून मुक्ती मिळाले, त्याचे जीवन सूकर झाले. त्याची श्रवणशक्ती जागृत झाल्याने जो आनंद मला झाला तो मोठा आहे. याबद्दल रुग्णालय व येथील डॉक्टरांचे आभार तीने मानले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुक व बधीर मुलांना शालेयोपयोगी वस्तुचे वितरण करण्यात आले. बालकांच्या पालकांना इम्पलांटमेट साहित्य सुपूर्द करण्यात आले. जागतिक श्रवण दिनानिमित्त पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमास मेयो रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते.