नागपूर :- जिल्ह्यामध्ये दर्जेदार खेळाडू तयार करायचे असल्यास खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या उत्तोमोत्तम सुविधा देण्याच्या दृष्टिने जिल्हा क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत आणि सुसज्ज सोई-सुविधा निर्माण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आज जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय गायधने, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय माहुरकर, मनपाचे पियुष आंबुलकर यांची उपस्थिती होती.
प्रत्येक तालुक्यात मुलभूत क्रीडा सुविधा निर्मितीसाठी विभाग क्रीडा संकुल निर्मितीची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यात आलेल्या क्रीडा सुविधांचे व्यवस्थापन, आराखडे व अंदाजपत्रक यावर चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती करण्याबाबत तसेच आमंत्रित सदस्य व राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रशिक्षण व खेळाडूंची निवड करण्यासंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी विभागीय कार्यकारी समितीचे सदस्य तसेच क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.