आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर राजभवन येथे कुलगुरुंची परिषद

– कुलगुरूंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात – राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना

मुंबई :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी सन २०३५ पर्यंत ५० टक्के इतकी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज राज्यातील उच्च शिक्षणातील सकल नोंदणी ३२ इतकी आहे. मात्र, गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात हे प्रमाण १४ टक्के आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील ड्रॉप आऊट दर जास्त आहे. हे चित्र बदलून आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करावीत तसेच त्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना राज्यपालांनी राज्यातील कुलगुरूंना केली.

‘आदिवासी विकास व संशोधन’ या विषयावर राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या दुसऱ्या परिषदेचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २६) राजभवन मुंबई येथे झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. परिषदेचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

परिषदेला राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष हर्ष चौहान, बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठ, राजपिपला, गुजरात येथील कुलगुरु मधुकरराव पाडवी, ‘स्वारातीम’ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, डॉ. उपेंद्र कुलकर्णी, तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते. 

आदिवासी समाजाचे अध्ययन व संशोधन कार्यालयात बसून होणार नाही. त्यामुळे कुलगुरुंनी आदिवासी गावांमध्ये समक्ष जाऊन तेथील समस्या समजून घ्याव्यात, अशी सूचना राज्यपालांनी केली.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला महत्व देण्यात आले असून आदिवासींना त्यांच्या भाषेतून शिक्षण दिल्यास ते त्यांना अधिक चांगले समजेल. या दृष्टीने मातृभाषांमध्ये पुस्तकांची निर्मिती झाली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

भारतात ७०० पेक्षा अधिक आदिवासी जनजातींचे लोक आहेत. आदिवासी समाज पर्यावरण रक्षक आहेत. आज आदिवासी समाजासमोर उपजीविकेचा प्रश्न उभा आहे. त्यांच्यापुढे कर्जबाजारी, वेठबिगारी, गरिबी, उपासमार, कुपोषण, स्थलांतर यांसारख्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवणे, त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचे रक्षण करणे, त्यांची संस्कृती जपणे व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे यासाठी विद्यापीठांना महत्वाची भूमिका बजवावी लागेल.

विद्यापीठांनी आदिवासी बहुल गावांशी संपर्क वाढवावा, काही गावे दत्तक घ्यावीत व आदिवासींच्या जीवनस्तर वाढेल अशा योजनांमध्ये गुंतवणूक करावी असे राज्यपालांनी सांगितले. याशिवाय विद्यापीठांनी आदिवासी बांधवांना वन उपजांचे पॅकेजिंग, विक्री यामध्ये देखील मदत करावी. आदिवासींच्या कौशल्य शिक्षण तसेच कौशल्य वर्धनाकडे देखील विद्यापीठांनी लक्ष द्यावे, असे सांगताना आदिवासींच्या सामाजिक, आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना सरकारी योजनांची माहिती द्यावी, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली.

आदिवासींच्या बाबतीत देशात आजवर योग्य समज विकसित झाली नाही. भारतीय इतिहासात ‘आदिवासी’ हा शब्दच मुळी नव्हता; तर ‘नगरवासी’, ‘ग्रामवासी’ व ‘वनवासी’ असे भौगोलिक स्थितीवर आधारित शब्द होते. इंग्रजांनी ‘आदिवासी’ शब्दाची परिभाषा केली आणि स्वातंत्र्यानंतर तीच परिभाषा आपण स्वीकारली. आदिवासी समाज कमी बोलणारा आहे. त्यामुळे उद्योजक – धोरण निर्माते यांना आदिवासी समाजाची पुरेशी माहिती नाही. या दृष्टीने आदिवासी समाजावर व्यापक संशोधन व डॉक्युमेंटेशन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष हर्ष चौहान यांनी यावेळी केले.

भारतीय संस्कृती व अध्यात्माचा आदिवासी संस्कृतीशी प्राचीन संबंध आहे. आदिवासी परंपरा अद्भुत असून आदिवासींच्या सणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. जल, जमीन, जंगल यांच्या सोबतचे त्यांचे नाते पर्यावरण पूरक असे आहे. त्यामुळे सर्व समाजांनी आदिवासींची जीवनशैली अंगीकारावी असे आवाहन राजपिपला गुजरात येथील बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पाडवी यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मल्टी मीडिया छायाचित्र प्रदर्शनात केंद्र शासनाच्या विकास कामाचे प्रतिबिंब, खासदार सुनिल मेंढे यांच्या हस्ते उदघाटन

Tue Sep 26 , 2023
भंडारा :-  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाने राबविलेल्या योजना तथा विकास कामांचे प्रतिबिंब मल्टी मीडिया छायाचित्र प्रदर्शनीत दिसत आहे. वंचितांना प्राधान्य ही गेल्या नऊ वर्षातील सुशासनाची ओळख बनली असल्याचे प्रतिपादन खासदार सुनिल मेंढे यांनी केले.जिल्हा प्रशासन व क्षेत्रीय सूचना व प्रसारण कार्यालयाव्दारे बसस्टॅण्डवर आयोजित मल्टी मीडिया छायाचित्र प्रदर्शनीच्या उदघाटनाप्रसंगी केले. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!