कॉर्समुळे जमिनीची अचूक मोजणी शक्य

Ø विभागात 12 जीपीएस सेंटर कार्यान्वित  

Ø मोजणीचे नकाशे रियल टाईममध्ये अचूक मिळणे शक्य

नागपूर :- जमीनीच्या मोजणीमध्ये अचूकता येण्यासाठी तसेच सर्व प्रकारच्या मोजणीचे नकाशे अक्षांस व रेखाशांसह तयार करण्यासाठी कॉर्स अर्थात निरंतर संचालन संदर्भ केंद्राची राज्यात 77 ठिकाणी उभारणी झाली आहे. त्यापैकी 12 कॉर्स केंद्र नागपूर विभागात सुरु झाले आहेत. कॉर्सच्या उभारणीमुळे वैश्विक स्थान निश्चिती (जीपीएस) आणि नकाशे तयार करण्यासाठी ग्लोबल नेवीगेशन सॅटेलाईट सिस्टीममुळे हवे असलेले अचूक नकाशे तात्काळ उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.

जमिनीच्या मोजणीचे अचूक नकाशे तयार करण्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभागांतर्गत राज्य शासनाने निरंतर संचालन संदर्भ केंद्र म्हणजेच कॉर्सची उभारणी केली आहे. त्यासाठी राज्यामध्ये एकमेकापासून साधारणपणे 70 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठिकाणाची निवड केली आहे. ग्लोबल नेविगेशन सॅटेलाईट सिस्टीम अर्थात जीएनएसएसचा वापरामुळे अत्यंत अचूक तसेच सध्याच्या वेळेनुसार नकाशे उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. यासाठी निरंतर संचालन संदर्भ केंद्र (कॉर्स) जीपीएस स्टेशन व रोव्हर याचा वापर करुन हवे तेव्हा अचूकपणे नकाशे तयार करणे सुलभ झाले आहे.

नागपूर विभागात 12 जीपीएस स्टेशन कार्यान्वित झाले असून त्याआधारे संपूर्ण भूमापणाचे नकाशे तयार होत आहेत. नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील गाव नकाशे या प्रणालीव्दारे सर्व सामान्य नागरिकांना उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची माहिती भूमि अभिलेख उपसंचालक विष्णु शिंदे यांनी दिली.

राज्यात जमीन मोजणीची सुरुवात सन 1830 ते 1860 या काळात झाली आहे. त्यावेळेस सर्वेकरिता गाव हा घटक मानून गावातील जमीनीची सर्वे नंबर निहाय मोजणी करण्यात येत होती. त्यासाठी शंकु-साखळीचा वापर करण्यात येत होता. या पध्दतीने रात्यातील बहुतांश गावाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वे नंबर हा घटक मानुन अधिकार अभिलेखे तयार करण्यात आले आहे. त्यानंतर 1920 च्या सुमारास मोजणीच्या पध्दतीमध्ये बदल होऊन प्लेन टेबलचा वापर करुन पोटहिस्सा मोजणीला सुरुवात झाली. या मोजणीमध्ये उंच झाडी अथवा पीके असलेल्या ठिकाणी मोजणीच्या वेळी वारंवार प्लेन टेबल बदलावा लागत असल्यामुळे‍ बेसलाईनमध्ये तफावत आढळुन येत होती. त्यासाठी सुरुवातीला टोटल स्टेशन आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीनचा वापर सुरु करण्यात आला. यामध्ये 03 मिलीमिटर पर्यंतची अचूकता घेता येत होती.

विभागात 12 जीपीएस स्टेशन

जमीनीची अचूक व रियल टाईम नकाशे उपलब्ध व्हावे यासाठी विभागात 12 कॉर्स जीपीएस स्टेशन कायम स्वरुपी सुरु केले आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील महालगाव (भिवापूर) ग्रामपंचायत परिसर कळमेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उभारणी करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील तहसिल कार्यालय परिसर व देवळी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह परिसरात. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा भूमि अभिलेख कार्यालय परिसर, मुल येथे इकोपार्क परिसर. गडचिरोली जिल्ह्यात वडसा येथील तहसिल कार्यालय कोर्ची येथील पंचायत समिती कार्यालय तसेच धानोरा व मुलचेरा येथील तहसिल कार्यालय परिसरात कॉर्स स्टेशन सुरु झाले आहे.

भंडारा जिल्ह्यातील गांधी विद्यालय परिसर भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जूनी येथील तहसिल कार्यालय परिसरात निरंतर संचालन संदर्भ केंद्र अर्थात कॉर्स केंद्र सुरु करण्यात आले आहे.

कॉर्स स्टेशन मुळे होणारे फायदे

· सर्व प्रकारचे मोजणी नकाशे अक्षांस व रेखाशांसह तयार होणार आहे.

· जीपीएस रिडींगची अचूकता वाढवून मोजणी कामामध्ये गतीमानता आली आहे.

· गावाठाण हद्दी निश्चिती अचूक व जलद करणे सुलभ झाले आहे.

· भविष्यात येणाऱ्या काही वर्षांमध्ये सर्व नकाशे Geo-Reference होतील.

· खाणकाम मोजणीसाठी रोव्हरचा उपयोग होईल त्यामुळे तात्काळ मोजणी शक्य झाले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपात ज्येष्ठ नागरिकांकरिता कार्यरत संस्थांचा सत्कार

Fri Oct 6 , 2023
– ज्येष्ठ नागरिक दिनाच्या औचित्याने सत्कार व चर्चा सत्राचे आयोजन नागपूर :- ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा अविभाज्य अंग आहेत, ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण व सोयी सुविधा मिळवून देण्याकरीता तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्याकरिता कार्यरत शहरातील विविध संस्थांचा नागपूर महानगरपालिका समाज विकास विभागाच्य वतीने सत्कार करण्यात आला. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!