– आंतरराज्य प्रकल्प समन्वय समिती
नागपूर :- पावसाळ्यात निर्माण होणारी पुरपरिस्थीती हाताळण्यासाठी तसेच सिंचन प्रकल्पातून अतिरिक्त पाणी सोडतांना तेलंगाना, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील महसूल व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांचे नियुक्ती करावी अशा सूचना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केल्या. नागपूर विभागातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा विभागीय आयुक्त् श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
पेंच, कन्हान, वैनगंगा, वर्धा आदी नद्यांना आलेल्या पूरामुळे नदीकाठच्या गावांना होणारा धोका टाळण्यासाठी तसेच शिरपूर, कालीसरा, पुजारीटोला, अप्परवर्धा, निम्नवर्धा या विभागातील सिंचन प्रकल्पासह मध्येप्रदेशातील संजय सरोवर, तेलंगानातील मेडीकट्टा या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आदी जिल्ह्यांत पूर परिस्थीती निर्माण होते. सिंचन प्रकल्पातून पाणी सोडतांना आंतरराज्य समन्वय आवश्यक असल्यामुळे प्रत्येक प्रकल्पावर समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी तसेच 24 तास नियंत्रण कक्ष सुरु करावा अशी सूचना विभागीय आयुक्तांनी दिली.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द प्रकल्पातून अतिरिक्त पाणी सोडतांना सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थीती निर्माण झाली होती. यावर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तेलंगाना येथील मेडकट्टा या प्रकल्पातून पूर नियंत्रणासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहून परिस्थती हाताळावी. या प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात येणाऱ्या गावातील शेतजमीनीचा मोबदला देण्यासाठी तेलंगाना प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा, आदी सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
बैठकीच्या सुरुवातीला जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. पी. के. पवार, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए. पी. देवगडे यांनी सादरीकरण केले. यावेळी महसूल उपायुक्त दिपाली मोतीयेळे, अधिक्षक अभियंता आर. जी. पराते, पी.एन. पाटिल, गोसीखुर्दचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक नितेश बंबोरे, पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री पी. वाय. झोड, इटियाडोहचे कार्यकारी अभियंता राजू कुऱ्हेकर आदी उपस्थित होते.