यवतमाळ :- केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाकडुन आयसीएआर कन्व्हेनशन सेंटर, राष्ट्रीय कृषि विज्ञान परिसर, पुसा रोड, न्यु दिल्ली येथे सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सहकार से समृध्दी या कार्यक्रमाचे थेट प्रसारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, सर्व तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी अधिकारी श्रेणी-१, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक, बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
सहकार से समृध्दी अंतर्गत नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या १० हजार बहुउद्देशीय प्राथमिक सहकारी संस्थांच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे वेबिनार लिंकद्वारे प्रक्षेपण करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हास्तरावर सहकार विभागामार्फत करण्यात आले.
केंद्रीय योजना सहकार से समृध्दी अंतर्गत जिल्ह्यामध्ये जनऔषधी केंद्र, आपले सरकार सुविधा केंद्र तसेच सहकारी संस्थेचे गोदाम हे उपक्रम सुरु केल्याबाबत विविध कार्यकारी सहकारी संस्था मारेगाव, पारवा व लाडखेड या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचा जिल्हा उपनिबंधकांच्याहस्ते शाल व पुष्षगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.