वाशीम :- भारताला जगाच्या पाठीवर श्रेष्ठत्व प्राप्त करून देण्याचा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा संकल्प असून हा संकल्प पूर्ण करण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राला मोठी जबाबदारी पार पाडावयाची आहे. म्हणून महाराष्ट्रातील महाअनाडी गटबंधनास पराभूत करून महायुतीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाशीम येथे झालेल्या विशाल जाहीर प्रचारसभेत बोलताना केले. केवळ सत्ता मिळविणे हे आमचे ध्येय नाही, तर देशाला वैभव प्राप्त करून जगाच्या पाठीवर प्रतिष्ठा मिळवून देणे हा आमचा संकल्प आहे, याची आठवणही त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील जनतेस करून दिली. वाशीम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्याम खोडे यांच्या प्रचारसभेत आदित्यनाथ बोलत होते.
आपल्या भाषणाच्या प्रारंभी योगी आदित्यनाथ यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, वीर सावरकर यांचे स्मरण केले. या नररत्नांना जन्म देणाऱ्या महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीतील जनतेशी संवाद साधण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो, असे सांगून त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे, त्यांनी दिलेल्या प्रेरणादायक संस्काराचे स्मरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताला स्वाभिमान आणि सन्मानाचे संस्कार दिले. त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी केलेला संघर्ष आजही भारतासाठी आजही प्रेरणादायक आहे, असे सांगून योगी आदित्यनाथ म्हणाले की, भारताच्या स्वाभिमानास जेव्हा धक्का लागतो, तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करतो. महाराष्ट्राच्या भूमीने महापुरुषांना जन्म दिला, संतांना जन्म दिला, या राज्यातील समाजसुधारकांनी देशाचे नेतृत्व केले. म्हणूनच देशाच्या भविष्याच्या संकल्पपूर्तीच्या वाटचालीत आता महाराष्ट्राने आपली जबाबदारी उचलायची आहे, असे आवाहन त्यांनी केले.
विधानसभेच्या या निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील महायुती, तर दुसरीकडे महाआघाडीच्या रूपाने महाअनाडी गठबंधन समोरासमोर आहेत. महाअनाडी नावाच्या या आघाडीस देशाची, धर्माची किंवा राष्ट्रभावनेची कदर नाही. त्यांना सामाजिक मूल्ये आणि आदर्शांची चिंता नाही, अशी टीकाही त्यांनी केली. छत्रपती शिवरायांनी आग्र्यास जाऊन विदेशी आक्रमक औरंगजेबास आव्हान दिले, त्यांचा तो संघर्ष आठवा, असे आवाहन करून योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीच्या लांगूलचालनी धोरणावर कडाडून टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी मूल्य आणि मर्यादांच्या रक्षणासाठी संघर्ष केला, संभाजीराजांनी ज्या मूल्यांसाठी संघर्ष केला, त्याची प्रेरणा घेऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला गेला. आता तोच संघर्ष आपल्याला लढायचा आहे, याची आठवण करून देण्यासाठी मी इथे आलो आहे, असे ते म्हणाले. याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबोडकरांचा अपमान केला, याच काँग्रेसने सतत देशाच्या सुरक्षिततेशी सतत तडजोडी केल्या, विदेशी शक्ती देशाला आव्हाने देत होती, देशात दहशतवादी कारवाया होत होत्या, तेव्हा काँग्रेसचे नेते मात्र, विदेशी राष्ट्रांसोबतचे संबंध बिघडतील या चिंतेने मूग गिळून गप्प बसत होते. आता मोदीजींच्या नेतृत्वाखालील नव्या भारताकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर त्या देशाचे ‘राम नाम सत्य है’ होणार यात शंका नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले, तेव्हा जनतेने उत्स्फूर्तपणे त्यास जोरदार प्रतिसाद दिला. आजच्या नव्या भारतात, चीनचे सैन्य मागे गेले असून आता भारताची सेना सीमेवर गस्त घालते आहे, असे ते म्हणाले.
आपल्या तडाखेबंद भाषणात योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर कडाडून हल्ला चढविला. हेच काँग्रेसवाले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवाले आमच्या प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्णाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उमटवत होते. आता मोदीच्या नेतृत्वाखालील सरकारने अयोध्येत राम मंदिराची उभारणी केल्याने, पाचशे वर्षांनंतर अयोध्येत रामलल्लाने जन्मभूमीवर दीपावलीचा आनंद अनुभवला. श्रीराम आमच्या रक्तात आहे, आमच्या जिभेवर रामनाम आहे, असेही ते म्हणाले. मोदीच्या नेतृत्वाखालील नवा भारत आज जोमाने प्रगतीची वाटचाल करत आहे. हा भारत कोणापुढे झुकणारा नाही आणि मागे हटणारा नाही. देशातील 140 कोटी जनतेच्या समृद्धी, सुरक्षिततेचा संकल्प घेऊन मोदी सरकार काम करत आहे, म्हणून महाराष्ट्राने त्यांना साथ देण्यासाठी महायुतीला मजबूत करा, असे आवाहनही त्यांनी केले.
आता काशी आणि मथुरेकडे कूच…
अयोध्या ही तर सुरुवात आहे, आता काशी आणि मथुरेच्या दिशेने आम्ही निघालो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दुष्ट अफझलखानाला मारले, त्याच्या नावाने औरंगाबाद शहर असणे लज्जास्पद आहे. ते नाव हटवून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणे ही अभिमानास्पद बाब आहे. जेव्हा आम्ही विभाजित होतो, तेव्हा आमच्यावर हल्ले झाले. जब बटे थे, तब कटे थे, म्हणून विभाजित राहू नका, संघटित रहाल तरच सुरक्षित रहाल, असे ते म्हणाले.