नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे भांडेवाडी येथे १००० मे. टन (/-२०%) क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र डिझाईन, फायनान्स, बांधणी, स्वमालकी, वापर आणि हस्तांतरण (DFBOOT) या धर्तीवर उभारणी आणि देखभाल दुरूस्ती प्रकल्पाचे भूमिपूजन सोमवार २७ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. सोमवारी घनकचरा प्रक्रिया केंद्र परिसर, बिडगाव रोड भांडेवाडी येथे सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन समारंभ पार पडेल.
कार्यक्रमाला आमदार सर्वश्री प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर अडबाले, डॉ. नितीन राउत, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांची विशेष उपस्थिती असेल.
नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थानांमधून निघणा-या कच-यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाकरिता M/s. SusBDe नागपूर महानगरपालिकेकडून कुठलेही टिपिंग शुल्क न घेता स्वखर्चाने प्रकल्पाची उभारणी करणार आहेत.
या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, कम्पोस्ट, आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार होणार असून, त्याची विक्री करण्याचे अधिकार M/s. SusBDe यांना देण्यात आले आहेत. बाय-प्रोडक्टच्या विक्रीमधून होणाऱ्या उत्पन्नातून प्रथम रु. 15 लक्ष प्रतिवर्ष मनपाला प्राप्त होणार आहेत. तसेच देखभाल व दुरुस्ती कालावधीत वाढीव रॉयल्टी देण्याबाबत कंपनीने सादर केले आहे. सदर प्रकल्प हा नागपूरसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून, Dry Fermantation Technology वर आधारित भारताचा एकमेव प्रकल्प आहे. पूर्ण क्षमतेचा प्रकल्प तयार करण्यासाठी लागणारी कालावधी मध्ये या जागे व्यतिरिक्त 9 एकर जागा Fresh *Waste* Prossessing साठी सुद्धा देण्यात आलेली आहे. 18 महिन्याची दिलेल्या कालावधी मध्ये हा प्रकल्पाला पूर्ण होईल. या प्रकल्पात ठिकठिकाणचा कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या कचरा वेचणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी केले आहे.