देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय  – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

– श्री वारणा महिला सहकारी उद्योग समूह सुवर्ण सोहळा, वारणा विद्यापीठ उद्घाटन

कोल्हापूर :- देशाच्या आर्थिक विकासात खाजगी उद्योग आणि व्यापार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. वारणानगर येथे आयोजित श्री वारणा महिला सहकारी उद्योग समुह सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठ उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे, वारणा बँकेचे संचालक निपुण कोरे, सावित्री महिला सहकारी संस्थेच्या संचालक शुभलक्ष्मी कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दारिद्र्य निर्मूलन, अन्न सुरक्षा आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन यामध्ये सहकारी संस्थांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, काळानुरूप सहकार संस्थांनीही स्वत: ला बदलण्याची गरज असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापनाला व्यावसायिक बनवले पाहिजे. सहकारी संस्थांमध्ये त्यांच्या सभासदांचे हित सर्वोच्च असले पाहिजे. कोणतीही सहकारी संस्था कुणाच्या वैयक्तिक स्वार्थाचे आणि फायद्याचे साधन बनू नये, अन्यथा सहकाराचा उद्देशच नष्ट होईल, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. सहकारात खरे सहकार्य हवे, व्यक्तीहित नको असेही त्यांनी सांगितले. वारणा उद्योगाच्या सर्वांगीण विकासात योगदान दिल्याबद्दल उपस्थित महिलांचे कौतुक केले.

देशात साडेआठ लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत आहेत. परंतु अनेक सहकारी संस्था भांडवल, संसाधनांचा अभाव, व्यवस्थापन अशा समस्यांना सामोरे जात आहेत. तरुणांना सहकारात सहभागी करून प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा समावेश केल्यास तरुण त्या संस्थांना नवसंजीवनी देऊ शकतात. सहकारी संस्थांनीही सेंद्रिय शेती, साठवण क्षमता निर्माण करुन, इको-टुरिझम यांसारख्या नवीन क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत. सहकारामुळे देशात येत्या काळात अजून समृद्धी येईल. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी 2021 मध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही सहकार क्षेत्राच्या सुव्यवस्थित आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सहकार धोरण आणण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी प्राथमिक ते उच्चस्तरीय सहकारी संस्थांपर्यंत अनेक प्रयत्न केले जात आहेत. सहकारी संस्थांना विविध योजनांतर्गत आर्थिक, तांत्रिक व प्रशिक्षण संबंधित सहाय्य दिले जात आहे. सर्व संस्थांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी या कार्यक्रमात केले.

राष्ट्रपतींनी केले उपस्थितांना आवाहन

शिक्षणाचे महत्त्व समजून घ्या आणि तुमच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. चांगले आणि नैतिक शिक्षण जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. नवीन तंत्रज्ञान शिकण्यात आणि स्वीकारण्यात पुढे रहा. हे तुमचे जीवन केवळ सोयीस्कर बनवणार नाही तर तुम्हाला त्याच्या गैरवापराबद्दल जागरूक करतील. आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरण संरक्षणाला महत्त्वाचे स्थान द्यावे. कारण पृथ्वी माता आणि तिची मुले वाचवण्यासाठी तुमचे छोटे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांना शक्य तितकी मदत करा आणि त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करा. देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी नेहमी तयार राहा. आमचे वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्न भारताला जागतिक स्तरावर उच्च स्थान मिळवून देतील, असे आवाहन राष्ट्रपती मुर्मू यांनी केले.

स्व.तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी पाठपुरावा करणार  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासामध्ये जोपर्यंत महिलांची भागीदारी वाढत नाही तोपर्यंत आपल्याला विकास करता येणार नाही. सहकारातून क्रांती घडू शकते. याचे खरं मॉडेल वारणानगरमध्ये येवून लोकांनी पहावं म्हणूनच येथील झालेल्या कामाबद्दल सहकार महर्षी स्व.तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी शासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, वारणा समूहामध्ये साखर कारखाना, दुग्ध उत्पादन, शिक्षण मंडळ, वीज निर्माण संस्था, सहकारी बँक, महिलांची बँक, शेती प्रशिक्षण संस्था, सहकारी बँक, महिलांची पतसंस्था, व्यायाम मंडळ, भगिनी मंडळ, सहकारी ग्राहक चळवळ, महिला औद्योगिक सहकार चळवळ, वारणा बाजार इ. विविध क्षेत्रामध्ये झालेली क्रांती थक्क करणारी आहे. आज वारणा समूहात तीन हजार कोटींच्या घरात उलाढाल होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महिला जोपर्यंत अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू होणार नाहीत तो पर्यंत विकसित भारताचेही स्वप्न पूर्ण करता येणार नाही. महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासन पाठिंबा देत असून लखपती योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, मोफत शिक्षण, मोफत एसटी प्रवास या योजनेतून त्या अधिक सक्षम होत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वारणा समूहाचे प्रमुख तथा आमदार डॉ.विनय कोरे यांनी प्रास्ताविक करताना भारताचे राष्ट्रपती सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात आल्याने त्यांचे आभार मानले. तसेच त्यांनी वारणा विद्यापीठास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले. त्यांनी प्रास्ताविकामध्ये वारणा समूहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.वारणा समूहातील कार्यरत महिलांनी राष्ट्रपतींना शिवराज्याभिषेक तेलचित्र भेट म्हणून दिले. तर सावित्री महिला सहकारी संस्थेच्या संचालक शुभलक्ष्मी कोरे यांनी राष्ट्रपती महोदयांचे कोल्हापुरी अलंकार व साडी देवून स्वागत केले. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आता सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Tue Sep 3 , 2024
मुंबई :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!