– जोडे मारो आंदोलनातून ‘पीरिपा’ने केला संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध
नागपूर :- अमेरिकेच्या दौऱ्यात राहुल गांधी सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग करीत आहेत. अशातच राहुल यांनी देश हा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर आपण आरक्षण संपविण्याचा विचार काँग्रेस करेल हे ठणकावून सांगितले. यातून राहुल गांधीची आरक्षण संपविण्याची गरळ हे काँग्रेसी मनोवृत्तीमधून स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केला. राहुल गांधी हे संविधान विरोधी असल्याने त्यांच्या अशोभनिय वक्तव्याचा राज्याभर जोडे मारो आंदोलनातून पीपल्स रिपब्लिकन पार्टी करणार असल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले.
शनिवारी सीताबर्डी, आनंद नगर येथील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात राहुल गांधीच्या पोस्टर जाळून व जोडे मारून आंदोलन करण्यात आले. पीरिपातर्फे राहुल गांधीच्या गैरकृत्याचा तिव्र निषेध नोंदवितांना जयदीप कवाडे बोलत होते.
आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, नागपुर शहर अध्यक्ष कैलास बोम्बले, जेष्ठ नेते अजय चव्हाण, विजय पाटील, कालिदास चरण मेश्राम, रवि बाणमारे, मुकूंद पाटील, राजु मसराम, दिलीप पाटील, कुशिनारा सोमंकुवर, सुमित डोंगरे, सत्यपाल भाजीपाले, डॅनी शामकुंवर, स्वप्निल महल्ले, पलाश थवरे, अफरोज सिद्दिकी यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, परदेशातून राहुल गांधीच्या विधानातून काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील काँग्रेसी विचार हे दिसून आले आहे. विरोधी पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या नेत्याकडून असे वक्तव्य हे त्यांची भविष्यातील योजना आरक्षणाला संपविण्याचे घाट असल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी गांधी परिवाराची परंपरा ही बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधी होती. त्याच घराण्याची परंपरा जपण्याचे काम राहुल गांधी करीत आहे. त्यांच्या मनातील हे विधान हे त्यांच्या पिढीला साजेसे आहे. संविधान निर्माते बाबासाहेबांनीच्या आरक्षणला संपविणारे खरे काँग्रेसी आहेत म्हणून आम्ही राहुल गांधीच्या या भविष्यातील प्रयत्नांना हानून पाडू असेही जयदीप कवाडे म्हणाले.