– जप्त मालमत्तांचा होणार लिलाव
– 31 मार्चपूर्वी मालमत्ता कर भरणा करण्याचे मनपाचे आवाहन
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 31 मार्चपुर्वी अधिकाधिक मालमता कर वसुलीचे ध्येय समोर ठेऊन नियोजन करण्यात आले असुन मनपाची पथके थकबाकीदारांच्या घरी जाऊन वसुली करीत आहेत. 31 मार्चपर्यंत शास्तीवर 25 टक्के सूट देण्यात आली असुन तरीही कर भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील व जप्त केल्या जात आहेत.नुकतेच एमईएल प्रभागातील तुकडोजी महाराज सेवा समिती इथे 13 गाळे सील करण्यात आले आहे .
प्रत्येक झोनमध्ये 5 याप्रमाणे 15 व मार्केट वसुलीसाठी 2 याप्रमाणे 17 पथकांवर वसुलीची जबाबदारी असुन आतापर्यंत 56.33% टक्के वसुली करण्यात आली आहे. मालमत्ता कराची थकीत व चालु मागणी मिळुन एकूण 80 कोटी 58 लक्ष रुपयांची मागणी आहे त्यातील थकीत व चालु मिळुन 45 कोटी 70 लक्ष रुपयांची वसुली झाली आहे. तिन्ही झोनमधील अनेक मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली असुन कर भरणा न करणाऱ्या 1 हजारांवर मालमत्तांना टाळे ठोकण्यात आले आहे. थकबाकीचा भरणा न केल्यास जप्ती केलेल्या मालमत्तांवर 15 दिवसांच्या आत कारवाई करण्याचा अधिकार मनपाला असल्यांने पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे .यापुढेही अशीच धडक कारवाई सतत सुरु राहणार असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात येत आहे.
यापूर्वी नियमित व आगाऊ कर भरणा करणाऱ्यांना चालु वर्षाच्या मागणीत 10 टक्के सूट देण्यात आली होती तसेच थकबाकीदारांना 15 फेब्रुवारी पर्यंत 50 टक्के शास्तीत सवलत देण्यात आली होती.ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट ही 31 मार्चपर्यंत लागू राहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे.
ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकवित आहेत त्या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.