नागपूर :- शहरातील प्रमुख तिनही नद्या आणि नाले सफाई सोबतच पूरामुळे बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे येत्या १५ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
शहरात सुरू असलेल्या विविध कार्यांचा झोननिहाय आढावा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज मंगळवारी (ता.१४) घेतला. मनपा मुख्यालयातील सभाकक्षात आयोजित आढावा बैठकीत मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे उपस्थित होते.
बैठकीमध्ये मनपा आयुक्तांनी नदी आणि नाले सफाई, पुरामुळे बाधित रस्त्यांची कामे आणि अतिक्रमण कारवाई संदर्भात आढावा घेतला. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक भागातील रस्ते खराब झाली. हे रस्ते दुरूस्त करण्यासंदर्भात झोनकडे आलेल्या प्रस्तावानुसार काम सुरू आहेत. पुरामुळे बाधित रस्त्यांच्या कामांच्या संदर्भात काही कार्यादेश बाकी असल्यास ते तातडीने निर्गमित करून कामाला गती देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले. याशिवाय त्यांनी झोननिहाय अतिक्रमण कारवाईचा देखील आढावा घेतला.
नदी आणि नाले सफाईबाबत कार्य प्रगतीपथावर आहे. शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा या तिनही नद्यांच्या एकूण 51 टक्के पात्राची सफाई पूर्ण झालेली आहे. तिनही नद्यांची आतापर्यंत झालेल्या सफाईमधून ८१८४६ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. नदी स्वच्छतेच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी सफाई कार्याकरिता अतिरिक्त मशीन अथवा मनुष्यबळाची गरज असल्यास तशी मागणी करण्याबाबत सूचना यावेळी आयुक्तांनी सर्व झोनला केली. घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे शहरातील नाल्यांच्या सफाईबाबत माहिती देण्यात आली. नागपूर शहरात एकूण २२७ नाले असून यापैकी १५३ नाल्यांची सफाई मनुष्यबळाद्वारे तर ७४ नाल्यांची सफाई मशीनद्वारे केली जाते. आतापर्यंत एकूण १६४ नाल्यांची सफाई पूर्ण झालेली असून उर्वरित नाल्यांची सफाई लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. विहीत वेळेत कार्य पूर्ण होण्याच्या दृष्टीने नाले सफाईच्या कार्यामध्येही मनुष्यबळ अथवा मशीनची गरज असल्यास तशी मागणी करण्याची सूचना करून संबंधित विभागाद्वारे ते पुरविण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.
या वेळी सहायक आयुक्त सर्वश्री हरीश राउत, गणेश राठोड, घनश्याम पंधरे, नरेंद्र बावनकर, प्रमोद वानखेडे, अशोक घारोटे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, विजय गुरूबक्षाणी, सुनील उईके, अनील गेडाम, मनोज सिंग, सचिन रक्षमवार, अजय पाझारे, उज्ज्वल लांजेवार, सतीश गुरनुले आदी उपस्थित होते.