– उत्तर नागपुरात आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता: 11) उत्तर नागपुरातील विविध ठिकाणी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत डॉ. अभिजीत चौधरी यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच नागरिकांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे त्वरीत निराकरण करण्यात यावे यासंदर्भात आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
उत्तर नागपूर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना त्यांच्या भागातील विविध समस्यांची पाहणी करून समस्यांचे निराकरण करण्याची विनंती करण्यात आली होती. संघटनेच्या विनंतीनुसार, आयुक्त डॉ. चौधरी यांनी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या प्रतिनिधींसह ज्योती नगर नाला, पाचपावली सूतिका गृह आणि बाळाभाऊ पेठ येथील रमाबाई आंबेडकर मनपा हिंदी-मराठी उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. याप्रसंगी आशीनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, कार्यकारी अभियंता अजय पाझारे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपंकर भिवगडे आणि डॉ. किंमतकर, यांच्यासह अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ज्योती नगर नाल्या जवळचे अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले. तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्याची सफाई करून नाल्यांची सुरक्षा भिंत सुधारण्याचे देखील निर्देश यावेळी त्यांनी दिले. तर पाचपावली सूतिका गृहामध्ये परिसराची तुटलेली भिंत नव्याने बांधण्याचे, स्वच्छता राखण्याचे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची योग्य सोय करण्याच्या सुचना देखील आयुक्तांनी दिल्या. याशिवाय मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी रमाबाई आंबेडकर बाळाभाऊ पेठ मनपा उच्च प्राथमिक शाळेतील दिव्यांग मुलांसाठी आयोजित उन्हाळी शिबिराला भेट दिली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संगठनेचे सर्वश्री नरेश सहारे, अश्विन बोरकर, रामटेके, तक्षशीला वाघधरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.