मुंबई :- राज्यातील नक्षलग्रस्त भागात सेवारत शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित सवलती देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत समिती गठित करण्यात आली आहे. त्या समितीच्या अहवालातील शिफारशींचा विचार करून निर्गमित होणाऱ्या सूचनांनुसार गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित नक्षलग्रस्त भत्ता लागू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
सदस्य किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, नगरपालिकेच्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना असा भत्ता मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यास तशा सूचना देण्यात येतील. गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील, असा भत्ता मिळण्याबाबत तपासून निर्णय घेतला जाईल. तसेच याबाबत अधिवेशन संपल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, अभिजित वंजारी, जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला.