– सिवर लाईन बदलण्याच्या कामाचे निरीक्षण
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता. ७) पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पा अंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. पाहणी दौऱ्यात अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, नेहरू नगर झोनचे कार्यकारी अभियंता नरेश शिंगनजुडे, हनुमान नगर झोनचे कार्यकारी अभियंता मनोज सिंग, प्रकल्पाचे सल्लागार डीआरए कन्सल्टन्टचे आदित्य राठी उपस्थित होते.
पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पामध्ये अमृत-२ अंतर्गत शासनामार्फत मंजुरी प्राप्त प्रकल्पांचे काम मनपाद्वारे सुरु आहेत. या प्रकल्पांची आयुक्तांनी पाहणी केली. त्यांनी नेहरू नगर झोन मधील श्यामबाग भविष्य निर्वाह निधी कार्यालयाजवळील वस्ती परिसरातील नवीन सिवर लाईन बदलवणे, हनुमान नगर झोनमधील शिवाजी नगर बेसा पॉवर हाऊस मागील भागातील नवीन सिवर लाईन बदलवणे आणि नरसाळा गारगोटी भागात नवीन सिवर लाईन टाकण्याच्या कामाचे निरीक्षण केले. श्यामबाग व शिवाजी नगर बेसा पॉवर हाऊस मागील भागातील सिवर लाईनचे काम पी. दास इन्फ्रास्ट्रक्चर द्वारे करण्यात येणार आहे.
नागरिकांकडून प्राप्त तक्रारींची दखल घेऊन या भागांमध्ये सिवर लाईनचे काम केले जात आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या पुढील अनेक वर्षाच्या सुविधेसाठी सर्व भागातील सिवर लाईन बदलावण्याचे काम प्राधान्याने करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. सिवर लाईन बदलावण्याचे काम झाल्यानंतर रस्त्याचे योग्य पुनर्भरण व्यवस्थित व त्वरित करणे तसेच कुठेही बांधकाम साहित्य, मलबा राहू नये याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देताना त्यांनी कारवाईचा देखील इशारा दिला. शिवाजी नगर बेसा पॉवर हाऊस मागील भागामध्ये अनेक घरांनी सिवर लाईनवर देखील अनधिकृत बांधकाम केल्याची माहिती विभागाद्वारे देण्यात आली. या भागातील नागरिकांना दीर्घकाळ सुविधा मिळावी यासाठी अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश डॉ. चौधरी यांनी दिले.
नरसाळा गारगोटी भागामध्ये लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसद्वारे नवीन सिवर लाईन टाकण्याचे काम केले जात आहे. या भागात प्रिकास्ट चेम्बर बसविले जात आहे. प्रिकास्ट चेम्बरमुळे जलद गतीने उत्तम दर्जाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी आयुक्तांना देण्यात आली. प्रिकास्ट चेम्बरच्या दर्जामध्ये कोणतीही कसूर न करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
याप्रसंगी मनपा उपअभियंता रवी मांगे, प्रशांत वाघमारे, माजी नगरसेवक नागेश सहारे, पी. दास इन्फ्रास्ट्रक्चर चे अवकाश पटेल आणि लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसचे मनीष शाह उपस्थित होते.