नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे लालगंज बांगलादेश येथील नाईक तलावाच्या पुनरुज्जीवनाचे कार्य सुरू असून या कामाची बुधवारी (ता.५) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली. तलावाच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित आवश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
आयुक्तांच्या पाहणी दौ-यात मुख्य अभियंता राजीव गायकवाड, सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता अजय गेडाम, सार्वजनिक आरोग्य अभियंता संदीप लोखंडे आदी उपस्थित होते.
मनपा आयुक्तांनी संपूर्ण प्रकल्पासंदर्भात माहिती जाणून घेतली. केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेंतर्गत नाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचे कार्य सुरू असल्याची माहिती विभागाद्वारे देण्यात आली. सद्यस्थितीत तलावाची किनार भिंत तयार करण्यात आली असून गाळ काढण्याचे काम मुख्यत्वाने सुरू असल्याबाबत कार्यकारी अभियंता संदीप लोखंडे यांनी सांगितले. पावसाळ्यात परिसरातील नागरिकांना त्रास होउ नये यादृष्टीने पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्णत्वास नेण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले.
आयुक्तांच्या पाहणी दौ-यादरम्यान माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि माजी नगरसेवक रमेश पुणेकर उपस्थित होते. त्यांनी स्थानिक अडचणींची माहिती देउन त्याबद्दल योग्य कार्यवाही करण्याची मागणी यावेळी केली. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास होणारी अडचण लक्षात घेता यादृष्टीने कामे करण्याबाबत त्यांनी मागणी केली. यावेळी आयुक्तांनी नाईक तलावाजवळून वाहणा-या नाल्याची देखील पाहणी केली. तातडीने नाल्याची संपूर्ण स्वच्छता करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
यावेळी सतरंजीपुरा झोनचे कनिष्ठ अभियंता राजीव राजुरकर, नाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचे कंत्राटदार विनय पाटील, सल्लागार निशिकांत भिवगडे आदी उपस्थित होते.