– विदर्भ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रत्यक्ष कृती कार्यक्रमावर चर्चा
नागपूर :- समाजातील पत्रकार हा घटक नेहमीच हलाखीचे जीवन जगत आला आहे. समाजातील चांगले वेचताना त्याचे कुटुंब मात्र नेहमीच आर्थिक संकटाला सामोरे जात असते. अडचणीच्या वेळी इतरांसमोर हात पसरावे लागतात. पत्रकारांची ही परिस्थिती बदलविण्याचा संकल्प आता व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेने केला आहे. ‘पत्रकार समृद्वी संकल्प उपक्रमा’च्या् माध्यमातून हा कायापालट होणार असून त्याचा शुभारंभ १ जुलैपासून विदर्भातून होणार असल्याची घोषणा व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी केली.
नागपूर येथील रवी भवन येथे १ जून रोजी व्हॉईस ऑफ मीडियाच्या विदर्भ विभाग पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात ते बोलत होते. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह विदर्भा विभाग अध्यक्ष मंगेश खाटिक, मार्गदर्शक प्रकाश कथले, विदर्भाचे पालक सचिव संजय पडोळे, जितेंद्र चोरडिया यांच्यासह विदर्भ कार्यकारिणी पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
पुढे बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले, व्हॉईस ऑफ मीडियाच्या संघटन बांधणीच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभर फिरणे झाले. पत्रकारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे लक्षात आले. याचा त्रास कुटुंबाला सहन करावा लागतो. कुटुंबातील सदस्यांचे आजार, मुलांचे शिक्षण यासाठी पत्रकारांना़ खस्ता खाव्या लागतात. हेच हेरून पत्रकारांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत देता यावी यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाने संकल्प केला. सामाजिक उपक्रम समितीच्या माध्यमातून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबासाठी विविध कल्याणकारी योजनांची आखणी करण्यात आली. या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्रपणे निधी उभारण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. एकंदरच हा संपूर्ण उपक्रम म्हणजे ‘पत्रकार समृद्धी संकल्प उपक्रम’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ १ जुलै रोजी विदर्भातून होणार असून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून जमा झालेला निधी पत्रकार व त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी उपयोगात आणणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
यावेळी विदर्भ विभाग अध्यक्ष यांनी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याच्या कार्याचा आढावा घेतला. संघटनात्मक बांधणी, प्रत्यक्ष कृती कार्यक्रम, पत्रकार गृहनिर्माण, पत्रकार भवन आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी यावेळी त्यांच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांचे स्वागत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कथले यांनी केली. वर्धेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर, रामटेक तालुका अध्यक्ष राजू कापसे, मौदा तालुका अध्यक्ष संदीप गौरखेडे यांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष संदीप काळे तथा विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटिक यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन राजेश सोनटक्के यांनी केले. आभार आनंद आंबेकर यांनी मानले.
लढ्याला यश, सदस्यांचे कौतुक
डिजीटल मीडियाच्या पत्रकारांना श्रमिक पत्रकारांचा दर्जा देण्यात यावा, ही मागणी व्हाईस ऑफ मीडियाने लावून धरली होती. काही दिवसांपूर्वी राज्यभर केलेल्या धरणे आंदोलनात ही मागणी रेटून धरली. अखेर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत होत असून व्हाईस ऑफ मीडियाने मागणी उचलून धरल्यामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया प्रत्येक जिल्ह्यातून येत आहे. याबाबत प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी भरभरून सांगितले. शुभेच्छांचा वर्षाव आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे कौतुक होत असल्याचा उल्लेख प्रत्येकाने केला.