नागपूर :- केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत रघुजी नगर, दक्षिण नागपूर येथे स्थित कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना –ईपीएफओ , प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयुक्त शेखर कुमार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व शासकीयकामांचा निपटारा आणि प्रलंबित प्रकरणे आणि विशेष अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
यावेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत पेन्शन मिळालेल्या ज्येष्ठ पेन्शनधारकाच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे अनावरण करून विशेष मोहीम 2.0 चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वृक्षारोपणाही करण्यात आळे. सर्व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. यासोबतच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून कार्यालय परिसराची स्वच्छता केली. यानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामाच्या ठिकाणी जाऊन वैयक्तिकरित्या कामाच्या ठिकाणांची स्वच्छता करून कामाचे नियोजन केले. यासह, निरुपयोगी फाईल्स आणि रेकॉर्ड वगळण्यासाठी, अशा फाईल्स आणि दस्ताऐवज चिन्हांकित आणि सूचीबद्ध करण्यात आल्या . या मोहिमेत सहाय्यक आयुक्त मिलिंद देऊळकर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नागपूर कार्यालयामार्फत सभासदांच्या सार्वजनिक तक्रारींचे दैनंदिन निवारण केले जात असून जनसंपर्क केंद्रात येणाऱ्या अभ्यागतांच्या समस्यांचीही विशेष दखल घेऊन कार्यवाही केली जात आहे. तसेच सभासदांच्या ई-नामांकनासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व वृद्धांना मुख्य गेटपासून जनसंपर्क केंद्रापर्यंत येण्यासाठी व्हील चेअरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सभासदांच्या सोयीसाठी सर्व संबंधित शाखा तळमजल्यावर एकाच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या दालनात ‘माहिती कियोस्क’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कार्यालय स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या सहकार्याने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छता अभियानांतर्गत काही ठिकाणांची निवड करण्यात आली असून, त्याठिकाणी निरुपयोगी साहित्य काढून स्वच्छ ठिकाणे विकसित करण्यात आली आहेत. कार्यालयाच्या सुशोभिकरणासाठी कारंजेयुक्त उद्यान विकसित करण्यात आले आहे. कार्यालयातील निरुपयोगी ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठीही कारवाई करण्यात येत आहे. दोन्ही कार्यालयाच्या इमारती ऑनलाइन जोडण्यासाठी आणि दोन्ही कार्यालयांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर स्मार्ट सिटी सस्टेनेबल डेवलपमेंट कॉर्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण प्रादेशिक कार्यालय स्मार्ट सिटी वाय-फाय सुविधेने जोडण्यात येत आहे. याद्वारे निवृत्तीवेतनधारक, सभासद आणि नियोक्ते यांना क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात मोफत वाय-फायद्वारे सुलभता प्रदान केली जाईल जेणेकरून त्यांना ऑनलाइन सुविधांचा लाभ घेता येणार आहे.