प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

मुंबई :-भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. २६) शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले व विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. राज्यपालांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील जनतेला उद्देशून मराठीतून संबोधन केले. (राज्यपालांच्या भाषणाची प्रत सोबत जोडली आहे)

शासकीय सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विविध देशांचे मुंबईतील राजदूत, सैन्य दले, प्रशासन तसेच पोलीस दलातील वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर राज्यपालांनी निमंत्रितांची भेट घेतली व सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी झालेल्या संचलनामध्ये भारतीय नौदल, यंदा प्रथमच निमंत्रित तेलंगणा पोलीस पथक, राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस, मुंबई रेल्वे पोलीस दल, गडचिरोली व गोंदियाचे सी – ६० पथक, गृहरक्षक दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), राज्य उत्पादन शुल्क, वन विभाग, मुंबई अग्निशनमन दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल व सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा यांच्या कंपन्यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थी व युवकांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना दल (मुले / मुली), सी कॅडेट कोअर (मुले / मुली), रोड सेफ्टी पॅट्रोल (मुले व मुली), भारत स्काऊट आणि गाईड्स (मुले आणि मुली) यांनी आपल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पोलीस वाद्यवृंद तसेच पाईप बँड पथक यांना लोकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सादर केलेला ‘एक प्रवास ऑलिम्पिककडे’ या क्रीडा प्रात्यक्षिक व चित्ररथ तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सादर केलेल्या ‘महाराष्ट्राची वाद्य परंपरा’ या प्रात्यक्षिक व चित्ररथाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

राजभवन येथे राज्यपालांचे ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला सलामी दिली तसेच उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रगीत म्हटले. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com