नागपूर :- या वर्षीच्या जी 20 परिषदेचे अध्यक्षपद भूषवित असलेल्या भारतामधे, या परिषदेचा एक अंग म्हणून सी -20 म्हणजेच सिव्हिल-ट्वेंटी इंडिया परिषदेचे आयोजन 20 ते 22 मार्च दरम्यान हॉटेल रॅडिसन ब्ल्यू, नागपूर येथे आयोजन केले असल्याची माहिती सिव्हिल 20 इंडिया सचिवालयाचे संरक्षक तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सामाजिक तथा अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून परिषदेला जी20 भारताचे शेरपा अमिताभ कांत,रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील प्रतिनिधी शैामी शाह, इंडोनेशिया आणि ब्राझीलचे जी-20 शेरपा यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.नोबेल पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या परिषदेचे समापन होणार आहे.
नागपूर हे देशाचे केंद्र असून नागपुरात होणारी ही बैठक महत्वाची आहे.देशातील एनजीओची विश्वासार्हता जपून त्यांनी सामाजिक क्षेत्रासाठी अजून पुढाकार घ्यावा यावर सी -२० मध्ये चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिषदेत एकूण 14 विषयावर चर्चा होणार असून नागपूर येथे ही महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. नदी प्रदूषण थांबविणे, जलस्त्रोत वाढविणे, देशातील हस्तकला, कला संस्कृतीचे संवर्धन, सामाजिक भान जपणे, पर्यावरणीय समतोल राखणे, शाश्वत विकासाचे उद्दिष्ट यावर सुद्धा विस्तृत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरातील आणि विदर्भातील प्रश्नांना नागपूर व्हॉईस अंतर्गत एक वैश्विक मंच मिळावा असा सिव्हिल ट्वेंटी इंडिया परिषदेचा हेतू आहे. सिविल ट्वेंटी इंडियात एकूण १४ विषयावर वर्किंग ग्रुप बनवलेले असून शिक्षा,स्वास्थ,यांत्रिकी पर्यावरण, कारागिरी,सेवा,लोकतंत्र,मानवाधिकार, सतत विकास,अशा विषयांचा यात समावेश आहे. या परिषदेत सुमारे २५० प्रतिनिधींचा समावेश असून यात विदेशातील प्रतिनिधींचा देखील समावेश आहे.या प्रतिनिधींना विदर्भातील पेंच देवलापार येथील अभयारण्ये सेवाग्राम आणि पवनार आश्रम यांची सुद्धा भेट घडवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागपूरचा समृद्ध वारसा जपणाऱ्या वास्तू, स्थळ यांचा देखील यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
सिविल ट्वेंटी इंडिया परिषद मार्फत वृक्षारोपण आणि परिषदेच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार असून या परिषदेतील ठराव जी-२० च्या सचिवालयाला पुरवणार येणार आहेत. सिव्हिल ट्वेंटी इंडिया परिषदेची ही बैठक ऐतिहासिक असे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सी -२० संदर्भातील माहिती https://civil20.net/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.