मुंबई : बीज गुणन केंद्र इसारवाडी या औरंगाबाद येथील प्रक्षेत्राचे फळ रोपवाटिकेत रूपांतर करून सीट्रस इस्टेट व सेंटर ऑफ एक्सलन्स 22.50 हेक्टर क्षेत्रात तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.
सीट्रस इस्टेट व सेंटर ऑफ एक्सलन्स पैठणच्या कार्यवाहीबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री संदिपान भुमरे बोलत होते. यावेळी फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुमरे म्हणाले की, एकूण क्षेत्रापैकी ४.५० हेक्टर क्षेत्रावर सेंटर ऑफ एक्सलन्स व उर्वरित १८.०० हेक्टर क्षेत्रावर सीट्रस इस्टेट इसारवाडी होणार असून, ४३ कोटी ७९ लाख, सात हजार सातशे रूपये खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सीट्रस इस्टेट अंतर्गत क्षेत्रात रंपूर लाइम, न्यूसेलर, काटोल गोल्ड, फुले – मोसंबी ही मातृवृक्ष असणार आहेत.
या सेंटरची मोसंबी फळ पिकाची जातीवंत, रोग व कीडमुक्त उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका तयार करणे, मोसंबीच्या दर्जेदार उत्पादन व शास्त्रोक्त लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व पीक प्रात्यक्षिक देणे. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे गट स्थापन करणे, मोसंबी पिकाच्या व्यवस्थापन, फळ प्रक्रिया, ग्रेंडिंग, पॅकेजिंग, साठवण, मार्केटिंग व निर्यातीला चालना देणे, इंडो – इस्राईल तंत्रज्ञानाने उत्पादकता वाढविणे, मृद व पाणी परीक्षण, ऊती व पाने पृथक्करण यासाठी प्रयोगशाळा तसेच निविष्ठा विक्री केंद्रातून शेतकऱ्यांना वाजवी दरात सुविधा देणे ही या सीट्रस इस्टेटची उद्दीष्टे आहेत.
या सीट्रस इस्टेटमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका, प्रात्यक्षिके, माती, पाणी, ऊती, व पाने पृथक्करण प्रयोगशाळा, निविष्ठा विक्री केंद्र, ग्रेडिंग, पॅकिंग, साठवण व कोल्ड स्टोरेज, औजारे बँक, फलोत्पादन तज्ज्ञ, वनस्पती रोगशास्त्र तज्ज्ञ, कीटकशास्त्र तज्ज्ञ, माती परीक्षण तज्ज्ञ तसेच शास्त्रज्ञ यांच्या सेवा विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सुविधा या सीट्रस इस्टेटमार्फत दिल्या जाणार आहेत.
तसेच, सेंटर ऑफ एक्सलन्स (मोसंबी) अंतर्गत इंडो इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये कलम काडीच्या आठ जातीची एकूण 154 झाडे, तर मूलकांडच्या तीन जातीची एकूण 80 झाडे असतील. ४.५० हेक्टरवर असलेल्या या सेंटरचा एकूण खर्च १२ कोटी ८३ लाख ५४ हजार एवढा असणार आहे. निर्यातक्षम फळ बागांची वाढ करणे, प्रति हेक्टर ३० टनापर्यंत उत्पादकता वाढविणे, गुणवत्तापूर्वक रोपांची निर्मिती करणे, आदर्श रोपवाटिकांची स्थापना करणे, काढणीत्तोर व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा तयार करणे, यांत्रिकी पद्धतीने बागांची छाटणी व अंतर मशागत करून मजुरीचा खर्च कमी करण्यास चालना देणे ही या सेंटरची ध्येय आहेत.
याशिवाय रोग व्यवस्थापन करणे, विविध वाणांची शिफारस करून उत्पादनात वाढ करणे, निर्यातयोग्य वाणांचा विकास करणे, पॅकिंग, प्रक्रिया यासारख्या काढणीत्तोर व्यवस्थापनावर भर देणे, कोल्ड स्टोरेजची उभारणी करून साठवण क्षमता वाढविणे, भौतिक व रासायनिक गुणधर्म योग्य असलेली जमिनीची निवड, कीड व रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे ही या सेंटर ऑफ एक्सलन्सची उद्दीष्टे आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.