संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून मोफत धान्य वितरित होणार!
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला कुलूप?
कामठी ता प्र 3:- कोरोना काळात सुरू केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून प्रतीलाभार्थीला पाच किलो धान्य दिले जात होते .आतापर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना दोन्ही योजनेतून धान्य मिळत होते .मात्र आता पंतप्रधान गरीब कल्याण योजना शासनाने बंद केल्याने सरकारचे एका योजनेतील धान्य वाचणार आहे तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून प्रति लाभार्थीला मोफत धान्य मिळणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रदूषणामुळे गरिबांना अन्न सुरक्षा देता यावी यासाठी केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली.डिसेंबर पर्यंत सरकारने या योजनेला सात वेळा मुदतवाढ दिली .एप्रिलमध्ये सहा महिन्यासाठी तर सप्टेंबर मध्ये तीन महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली.मात्र सरकारने आता मोफत धान्य देण्याचे घोषित केले असून ही मोफत धान्य वितरण योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देण्यात येणार आहे .राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्राधान्य गटासाठी (वार्षिक उत्पन्न 44 हजार रुपये असल्यास या गटात समावेश होतो)2 किलो गहू व तीन किलो तांदूळ प्रतीलाभार्थी दिला जात होता.त्यासाठी गहू 2 रुपये किलो तर तांदूळ 3 रुपये किलो दराने मिळत होता. आता हेच धान्य मोफत मिळणार आहे तर अंत्योदय (निराधार,परितकता, विधवा, आदीसाठीचा गट)या गटासाठी 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ प्रतिकार्ड दिला जात होता यासाठी गहू 2 रुपये किलो तर तांदूळ 3 रुपये किलो दराने दिल्या जात होते आता मात्र हे धान्य मोफत मिळणार आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेत प्राधान्य गटाला 1 किलो गहू व 4 किलो तांदूळ प्रतीलाभार्थी तसेच अंत्योदय गटासाठी 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ प्रतीलाभार्थी मोफत दिला जात होता .राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र असलेले लाभार्थी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेसाठीही पात्र होते त्यामुळे लाभार्थ्यांना दोन योजनेतून लाभ मिळत होता .पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला केंद्र सरकार वेळोवेळी मुदतवाढ देत होते मात्र सातव्यांदा मुदतवाढ दिल्यानंतर आता या योजनेस आठव्यांदा मुदतवाढ देणे टाळून थेट योजनाच कुलूपबंद केल्याने आता लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळेल मात्र एकाच योजनेतून .