मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही

– कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना

नागपूर :- विकासकांनी अर्धवट सोडलेल्या व रखडलेल्या धोकादायक इमारतींमुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेला आहे. अशा बेघर व मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देत त्यांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शासन करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरील चर्चेदरम्यान दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रखडलेल्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाने एमएसआरडीसी, एमआयडीसी, बीएमसी, म्हाडा, एसआरए, सिडको या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने योजना हाती घेतली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 2 लाख घरे पूर्ण करण्यात येणार आहे. सहभागी यंत्रणांना प्रत्येकी दोन ते तीन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देण्यात येतील. स्वयंविकासाच्या माध्यमातूनदेखील प्रोत्साहन देवून रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. अशा योजनेची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी ठाणे शहरात सिडको आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी तसेच सण आनंदात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस रस्त्यावर असतो. ऊन, पाऊस, वारा कुठलीही पर्वा न करता पोलीस आपले कर्तव्य बजावित असतो. पोलीसांना कुटुंबाची, घराची चिंता असता कामा नये, त्यासाठी काम करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे, पोलीसांच्या घरांविषयी सरकार सकारात्मक आहे. दुरावस्थेत असलेल्या पोलीस वसाहतींचा विकास करण्यात येईल, असेही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री म्हणाले, कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोकणातून 65 टीएमसी वाहून जाणाऱ्या पाण्याच्या उपयोगासाठी छोटे, मोठे बंधारे बांधण्यात येणार आहे. कोकणात जलसंधारणाच्या कामांतून पाणी अडवून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सागरी किनारा रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. कोकणात 8 पुलांना मान्यता दिली आहे. तसेच मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवेश नियंत्रीत हरीत महामार्ग शासन करणार आहे. यामुळे कोकणात निश्चितच पर्यटनाला चालना मिळणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

क्षयरोग निर्मूलनासाठी रुग्णांच्या समुपदेशनासह जनजागृतीही महत्वाची - मंत्री गिरीष महाजन

Sun Dec 22 , 2024
नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या नि-क्षय अभियानाच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी क्षयरोग रुग्णांच्या समुपदेशनासह जनजगृतीही महत्वाची असल्याचे प्रतिपादन मंत्री गिरीष महाजन यांनी केले. नि – क्षय अभियानाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील सर्व मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नड्डा म्हणाले की, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!