भंडारा :- भटकंती करणाऱ्या नाथजोगी समाजातील नागरिकांना जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने त्यांच्या घरी जाऊन जात प्रमाणपत्र दिले.शासन आपल्या दारी या येाजनेच्या अंमलबजावणीची ही फलश्रुती म्हणावी लागेल.लाखांदूर तालुक्यातील कोदामेडी या गावाजवळील नाथजोगी समाजातील सहा व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यात आले.
नाथजोगी समाज हा मुळात भटकंती करणारा समाज आहे.एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन लोकांचे भविष्य पाहणे व भिक्षा मागून मिळणाऱ्या उत्पन्नातून स्वत:चे व कुटूंबाचे उदरनिर्वाह करणे ,त्यासाठी सतत स्थलांतरीत होणे व सतत स्थलांतरीत होत असल्यामुळे मुलांना शाळेत शिक्षणासाठी न पाठविणे यामुळे नाथजोगी समाजातील लोकांकडे महसूली व शालेय पुरावे नसतात.
तसेच नाथ जोगी समाजातील काही लोक मागील बऱ्यांच वर्षापासून कोदामेडी येथे स्थायिक आहेत.परंतु त्यांच्याकडे पुरावे नसल्यामुळे ज्यांना जात प्रमाणपत्र मिळत नव्हते. तत्कालीन जिल्हाधिकारी संदिप कदम यांनी नाथजोगी समाजातील लोकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी स्वत:वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासंबंधीचे निर्देश दिले होते..जात वैधता प्रमाणपत्र अभावी मुलांना मागासवर्गीयासाठी राखीव असलेल्या जागेतून उच्च शिक्षण घेता येत नव्हते.
नाथजोगी समाजातील लोकांना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सर्वात प्रथम दक्षता पथकामार्फत चौकशी केली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली समितीमधील सदस्य संशोधन अधिकारी, डॉ.सचिन मडावी,पोलिस निरीक्षण विशाल गिरी,तसेच पोलिस निरीक्षक दक्षता पथक व समिती कार्यालयातील कर्मचारी यांनी स्वत: कोदामेडीला या गावाला भेट दिली.
या समितीला कोंदामेडी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथील नाथजोगी समाजातील लोकामध्ये नाथजोगी समाजातील सर्व चालिरीती,रुढीपरंपरा व गुण वैशिष्टे दिसून आल्याने त्यांना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा समितीने निर्णय घेतला.या समितीने स्वत:हून इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जात प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव समितीकडे सादर करण्यासाठी प्रोत्साहीत केले.त्यानुसार समितीला 6 अर्ज प्राप्त झाले.व ती सर्व अर्ज समितीने वैध ठरवून 24 जुलै 2023 रोजी कोदामेडी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथे समितीच्या वतीने उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने डॉ.मंगेश वानखेडे,यांचे हस्ते जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेणे सोयीचे होणार आहे.असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे डॉ.मंगेश वानखडे यांनी कळविले आहे.