मनपा आयुक्तांचे सर्व झोनच्या सहा.आयुक्तांना निर्देश
नागपूर : नागरिकांचा मागास प्रवर्गाची टक्केवारी निश्चित करण्यासाठी समर्पित आयोग गठित करण्यात आले आहे. या आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या टक्केवारीची माहिती विहीत कालावधीत संकलित करुन त्याचा अहवाल लवकरात-लवकर सादर करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी सर्व सहा.आयुक्तांना दिले.
नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या टक्केवारीची माहिती संकलित करण्याबाबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या पत्राचे अनुषंगाने गुरुवारी (ता.2) मनपा आयुक्तांनी सर्व झोनच्या सहायक आयुक्तांची बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात झालेल्या बैठकीत अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, सहा.आयुक्त विजय हुमणे, सहा.आयुक्त महेश धामेचा, सहा.आयुक्त प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरिष राऊत यांच्यासह सर्व सहा.आयुक्त उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांना नागरिकांचा मागास प्रवर्गाची टक्केवारी निश्चित करण्यासाठी समर्पित आयोग गठीत केलेले आहे. या आयोगाच्या कार्यकक्षेप्रमाणे उपलब्ध अभिलेख, अहवाल व इतर माहितीच्या आधारे राज्यातील नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय आरक्षण ठरविण्यासाठी विविध सांख्यिकी माहिती आयोगाकडून संकलित करण्यात येत आहे..
नुकतेच मध्यप्रदेश राज्यासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आयोगाने अवलोकन केले आहे. या पार्श्वभुमीवर सर्वेक्षण करुन स्थानिक स्वराज्य संस्था निहाय नागरिकांचा मागास प्रवर्गाची टक्केवारी निश्चित करणे आयोगाच्या मते आवश्यक असल्याने यासाठी मतदार याद्यांचा उपयोग करणे हा पर्याय आयोगाने सूचविला आहे. या संदर्भातील माहिती संकलीत करून सांख्यिकी अहवाल पुढील कार्यवाही करण्यासाठी शासनास सादर करण्यासंदर्भात प्रधान सचिवांव्दारे पत्र देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीत शासनास सादर करावयाच्या नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या माहिती संदर्भात तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही लवकरात-लवकर करण्याचे निर्देश देऊन यासाठी आवश्यक कर्मचारी तातडीने नियुक्त करुन पथक तयार करावेत व यासाठी संबंधित झोनचे सहा.आयुक्त हे नियंत्रण अधिकारी म्हणुन काम पाहतील, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी सर्व सहा.आयुक्तांना दिले.