मुंबई, दि. 3 : जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये जागतिक विक्रम केला आहे. बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
क्रीडा श्रेणीमध्ये ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने सन्मानित जिया राय हिचा सत्कार महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी केला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, जियाला ऑटिझम आहे, तरीही ती उत्तम जलतरणपटू बनली आहे. अवघ्या तेरा वर्षाच्या जियाने आज हा विश्वविक्रम केला आहे. पालकांनी आपल्या मुलांमध्ये काय कमी आहे, हे न पाहता ते काय करू शकतात याकडे लक्ष दिले पाहिजे. जियाच्या या यशात तिच्या पालकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांचाही सत्कार आणि अभिनंदन मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले. जियाला भविष्यात जी काही मदत लागेल त्याबाबत शासन म्हणून आम्ही नेहमीच तिच्या पाठीशी असू, असे मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.
या सत्कार समारंभास जियाचे वडील मदन राय आणि आई रचना राय उपस्थित होते.