– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी
ठाणे :- ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. लहान वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी अवजड वाहने डाव्या बाजूने चालविण्यासंदर्भात सूचना, तसेच या मार्गावरील खड्डे तातडीने मास्टिकने भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकाथ शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे- नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, खडवली फाटा या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणे तसेच खड्ड्यांच्या उपाययोजना संदर्भात यापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष या महामार्गाची पाहणी केली. ज्या-ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सर्व ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हे खड्डे तात्काळ मास्टिक पद्धतीने बुजविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री यांनी आज या मार्गाची पाहणी केली.
ठाणे नाशिक महामार्गावरील पडघा पर्यंतच्या रस्त्याचे आठपदरीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी पंक्चर आहेत किंवा कट आहेत, ते बंद करण्यात यावे. तसेच रस्ता ओलांडून गावात जाण्यासाठी असलेल्या ठिकाणी हाईट बॅरिअर लावून मोठी वाहने त्या ठिकाणाहून वळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. रस्त्याच्या डाव्या बाजूनेच अवजड वाहने चालविण्यात यावीत, जेणेकरून लहान वाहने व रुग्णवाहिकांना एका बाजूने रस्ता मोकळा मिळेल, यासाठी वाहन चालकांना सूचना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मोठ्या प्रमाणात अवजड वाहने रस्त्यावर आल्यास ही वाहने थांबविण्यासाठी काही ठिकाणी तात्पुरत्या पार्किंगची सुविधा करण्यात यावी, त्या ठिकाणी वाहनचालकांसाठी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करावे तसेच इतर सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या आहेत. राजनोली व माणकोली येथील उड्डाणपुलाखालील रस्त्यांची डागडुजी करावी, जेणेकरून गर्दीच्या काळात या ठिकाणी अवजड वाहने थांबविता येतील. तसेच माणकोली येथील वाहतुकीस अडथळा येणारी दुकाने, गाळे तेथून हटविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
ठाणे ग्रामीण पोलीसांच्या मुख्यालयासाठी निश्चित केलेल्या सापे येथील जागा, तसेच काही दिवसांपूर्वी पडघ्यातील खडवली फाटा येथे झालेल्या अपघात स्थळाची पाहणीही मुख्यमंत्री यांनी केली. जीप व कंटेनरचा अपघात दुर्देवी असून असे अपघात घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात यावी. या ठिकाणी सेवा रस्ता (Service Road)तातडीने करण्यात यावा, भिवंडी येथे आरोग्य उपकेंद्र उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून आरोग्य विभागाकडून त्यासाठी निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे, प्रकाश पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एमएसआरडीएचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्यासह एमएमआरडीए, एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य महामार्ग पोलीस, ठाणे शहर व ग्रामीण पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदीसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे महापालिका आयुक्तांना निर्देश
आज पावसाने उसंत घेतल्याने मुंबई शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दूरध्वनीवरून दिले. तसेच मुंबई व परिसरातील रेल्वे स्थानकांजवळचे रस्ते, रेल्वे मार्गावर पाणी साचणारी ठिकाणे आदी तातडीने स्वच्छ करून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री महोदयांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिले. तसेच एमएमआरडीच्या अखत्यारित येत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या सूचनाही एमएमआरडीए आयुक्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.