नवी मुंबई :- डोंबिवली येथील घेसरगाव येथून पंढरपूरकडे खासगी बसने निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळंबोली येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली. या दूर्घटनेत दूदैवाने मृतपावलेल्या वारकऱ्यांच्या कुटूंबीयांना शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जखमींची विचारपूस केली तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांकडून जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, डोंबिवली येथील घेसरगांव परिसरातील वारकरी भक्त MH-02-FG-9966 या क्रमांकाच्या खासगी बसने पंढरपूरच्या दिशेने जात असतांना 15 जुलै 2024 रोजी मध्येरात्रीच्यावेळी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कळंबोली पासून काही अंतरावर या खासगी बस आणि बसपुढे चालणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाल्याने बस मधील एकूण 54 वारकऱ्यांपैकी 03 वारकरी व ट्रॅक्टरमधील 02 व्यक्ती अशा एकूण 05 व्यक्तींचा दुदैवी मृत्यू झाला असून, 46 जखमी वारकऱ्यांवर कळंबोली येथील महात्मा गांधी मीशन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी 7 वारकरी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अती दक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अपघातातील जखमींच्या वैद्यकीय उपचारावरील सर्व खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुंख्यमंत्र्यांनी झालेल्या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.