नायगाव येथे दहा एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा :- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले देशाला वरदान लाभलेले आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे दहा एकर क्षेत्रात 100 कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

थोर समाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 193 वा जयंती सोहळा राज्य शासन व सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने नायगाव (ता. खंडाळा) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार महादेव जानकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार सर्वश्री मकरंद पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्त्री स्वातंत्र्य हा शब्दही माहीत नसलेल्या काळात त्यांनी स्री शिक्षणाची क्रांती केली. समाजाला जगण्याची दिशा दिली. अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सामाजिक कार्यासाठी ऊर्जा मिळते. माझ्यासाठी ते ऊर्जादायी आहेत. सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व, त्याग, योगदान यांची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहील.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाचे चैतन्य आहेत, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या अपार कष्टातूनच महिलांच्या जीवनात शिक्षणाची पहाट निर्माण झाली. त्यातूनच पुरोगामी महाराष्ट्र घडला. आज महिला मुख्य प्रवाहात आल्या आहेत. स्त्री शिक्षणातून महिला अबला नव्हे, तर सबला आहेत ही जाणीव निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. हा इतिहास जतन करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साताऱ्यात त्यांचे स्मारक सुस्थितीत आणण्यासाठी शासनाने भरघोस निधी दिला आहे.

नौदलातील युद्धनौकेचे नेतृत्व मराठी महिला करत आहे. त्यांचा आपल्याला अभिमान असून या सर्वांचे मूळ प्रेरणा स्त्रोत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले काम आहे. सावित्रीबाई नसत्या, तर देश, समाज पन्नास वर्षे मागे गेला असता. शिक्षणाची ज्योत महिलांच्या हाती देऊन समाजाला नवा प्रकाश देण्याचे काम त्यांनी केले आहे. अन्यायाच्या विरोधात उभे राहायचे प्रसंगी अन्याय करणारे आपल्या जवळचे असले तरी त्यांच्या विरोधात बंड करायचे ही शिकवण त्यांनी दिली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

फुले दांपत्य हा आपला अभिमान

फुले दांपत्य हा आपला अभिमान आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या कार्याचे स्मरण पुढच्या पिढ्यांना रहावे यासाठी त्यांचे भिडे वाड्यात मोठे स्मारक उभे करण्यात येत आहे. शासनाने अनेक योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या आहेत. यामध्ये लेक लाडकी, जिल्हा वार्षिक योजनेतून मुख्यमंत्री महिला सशक्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महिलांना एसटी प्रवास शुल्कात 50 टक्के सवलत दिली आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग, विक्री यासाठीही योजना करत आहोत. इतर मागासवर्गीय घटकातील मुलींसाठी ७२ शासकीय वसतिगृह जानेवारी अखेरपर्यंत सुरू होत आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मंत्री भुजबळ म्हणाले की, समाज व्यवस्थेतील अंधश्रद्धा अनिष्ट प्रथा यांच्यावर प्रहार करताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सावित्रीबाई फुले या महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या. स्त्री शिक्षणासाठी सुरुवात करताना सावित्रीबाईंनी हाल अपेष्टा सहन केल्या म्हणूनच आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या विचारांचा प्रसार साहित्याच्या माध्यमातून केल्याने हे शक्य झाले. प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करत असताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. समाजसेवेसाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून राज्याप्रमाणे संपूर्ण देशात साजरा व्हावा यासाठी प्रधानमंत्री यांना विनंती करण्यात यावी असे आवाहनही मंत्री भुजबळ यांनी केले. मुलींना एनडीएमधील प्रशिक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रबोधिनीला 24 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रबोधिनीसाठी लवकरात लवकर जागाही उपलब्ध करून द्यावी अशी विनंती मंत्री श्री. भुजबळ यांनी केली. नायगाव येथील त्यांच्या स्मारकासाठी प्रा. हरी नरके यांनी दिलेल्या योगदानाची आठवण केली.

मंत्री सावे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन शासन महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवित आहे , असे सांगून महिलांना स्वयं सिद्ध करण्यासाठी विविध योजनांच्या माहिती देणाऱ्या प्रणालीचे उद्घाटन यावेळी करण्यात येत असल्याचे सांगितले. महाज्योतीच्या माध्यमातून एनडीए व पोलीस प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नायगावला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

पालकमंत्री देसाई म्हणाले की, नायगाव या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी शासनाने मूलभूत सोयी सुविधांचे जाळे निर्माण केले आहे. या ठिकाणी पर्यटक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर यावेत. त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाईं फुले यांची प्रेरणा घेऊन समाजात मूलभूत परिवर्तनासाठी कार्य करावे. यासाठी जागतिक दर्जाचे अभ्यास केंद्र या ठिकाणी निश्चितपणे उभे करण्यात येईल.

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर म्हणाल्या, स्त्रियांचा संघर्ष हा जन्मापासून नव्हे, तर गर्भापासूनच सुरू आहे. विधवा प्रथा आणि बाल विवाह प्रतिबंधाचे ठराव ग्रामपंचायतस्तरावर मंजूर होत आहेत, त्यांची अंमलबजावणीही काटेकोरपणे झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी आमदार गोरे यांनी नायगाव नगरीत शासनाने दहा एकर जमीन खरेदी करावी व त्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभे करावे अशी मागणी केली.

या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. ‘महाज्योती’मार्फत उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री यांच्याहस्ते महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेच्या पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन झाले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, सरपंच साधना नेवसे, यांच्यासह अधिकारी, बचत गटातील महिला, शालेय महाविद्यालयीन युवती व नागरिक यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

GMC में मनाया गया नववर्ष का जश्न

Thu Jan 4 , 2024
नागपुर :- पिछले 9 साल हो गए हैं जब हमारे शहर के युवा नए साल का जश्न गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपुर (जीएमसी) में एक अलग अंदाज में मनाते आ रहे हैं। यह समूह का 10वां वर्ष है, समूह के सदस्यों ने फलों के किट वितरित किए, जिनमें सेब, 2 केले, अन्नार, चीकू, बिस्किट, बोर्नविटा और चिक्की, अमरूद के प्रत्येक पैकेट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!